
नाशिक/पंचवटी : दिव्यांचा उत्सव असलेल्या दीपावलीसाठी शहरात वेगवेगळ्या आकारातील आकर्षक पणत्या, लक्ष्मीपूजनासाठी लागणारे बोळके, दिवे बाजारात दाखल झाले आहेत. पारंपरिक पणत्यांना आता आकर्षक रंगीत साज चढविण्यात आला असून, अशा वेगळ्या आकारातील व रंगातील पणत्यांना यंदा मोठी मागणी आहे.
दीपोत्सवाची लगबग आता ख-या अर्थाने सुरू झाली आहे. तेजाचा, प्रकाशाचा, दिव्यांचा सण अशी ओळख असलेल्या दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारस अवघ्या सात दिवसांवर आले असून, त्यासाठी आकर्षक पणत्या बाजारात आल्या आहेत. यातील साध्या पणत्या व बोळके स्थानिक कारागीर तर डायमध्ये बनविलेल्या पणत्या राजकोटहून शहरात विक्रीसाठी येतात. सध्या हे विक्रेते सहकुटुंब गंगाघाट, कोणार्कनगर परिसरात आले आहेत. दिव्या, पणत्यांसह वेगवेगळ्या आकारातील कुंड्या, माठ यांची निर्मितीही करत असल्याचे विक्रम प्रजापती या व्यावसायिकाने सांगितले. यंदा मातीसह रंग व अन्य सामग्रीच्या दरांत वाढ झाल्याने दरांत दहा टक्के वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात.
व्यवसायावर अडीचशे जणांची मदार
कुंड्या, काळ्या व लाल मातीतील माठ तसेच पणत्या, बोळके तयार करून विक्री करणा-या प्रजापती कुंभार या समाजातील जवळपास पन्नास घरे या व्यवसायावर अवलंबून आहेत. यात एका कुटुंबात पाच सदस्य गृहित धरले तर साधारणः अडीचशे जणांची या व्यवसायावर गुजराण होते. गंगापूर गावासह गंगापूर धरणाच्या पायथ्याशी या समुहातील लोकांची मोठी वस्ती आहे. येथील ज्येष्ठांपासून चिमुरड्यांपर्यंत सर्व जण चिखलमातीच्या या व्यवसायात रममाण असले तरी विकासाचा ध्यास त्यांनाही आहे. मात्र कुटुंबातील आई आणि वडील दोघेही अल्पशिक्षित असल्याने पुढील पिढीही शिक्षणासाठी फारशी आग्रही नसल्याचे दिसून आले.
बाजारात दाखल पणत्यांचे घाऊक दर
साध्या पणत्या : २० रुपये डझन
स्टॅन्ड पणत्या : १५ रुपये नग
रंगीत पणत्या : ३० ते ५० रुपये डझन
लाल पणत्या : २५ रुपये डझन
मातीचे नारळ (दिवा) : ५० रुपये
साधे बोळके : २० रुपयांत ५ नग
रंगीत बोळके : ५० रुपयांत ५ नग
यावर्षी माती, रंग व अन्य सामग्रीच्या दरात वाढ झाली आहे. व्यवसायात ही पाचवी पिढी असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप ग्राहक नसलेतरी आगामी काळात वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
- विक्रम प्रजापती, व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.