कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्‍तांची संख्या अधिक! घटतेय रुग्णसंख्या 

अरूण मलाणी
Saturday, 14 November 2020

कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात २०६ नवीन बाधित आढळले, तर उपचार घेत असलेल्‍या सहा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. दुसरीकडे ४२० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली.

नाशिक -जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना शुक्रवारी (ता. १३) कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात २०६ नवीन बाधित आढळले, तर उपचार घेत असलेल्‍या सहा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. दुसरीकडे ४२० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्टिव्‍ह रुग्णसंख्येत २०८ ने घट होऊन सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात दोन हजार ६४४ बाधित उपचार घेत आहेत.

ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत जिल्ह्यात २०८ ने घट 
शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १३१, नाशिक ग्रामीणचे ७२, तर जिल्‍हाबाहेरील तीन रुग्ण आहेत. अनेक दिवसांनंतर मालेगाव महापालिका हद्दीतून एकही नवीन कोरोनाबाधिताची भर पडली नाही. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १४७, नाशिक ग्रामीणचे २६८, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. सहा मृतांमध्ये नाशिक शहरातील दोन, नाशिक ग्रामीणच्‍या तीन, तर जिल्‍हाबाह्य एका रुग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

आतापर्यंत एक हजार ७२५ रुग्‍णांचा मृत्‍यू

दिवसभरात आढळले २०६ बाधित, ४२० रुग्‍ण कोरोनामुक्‍त, सहा मृत्‍यू 
यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९६ हजार ६३६ झाली असून, यापैकी ९२ हजार २६७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ७२५ रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६८१, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २२, मालेगाव महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात सहा, जिल्‍हा रुग्‍णालयात आठ रुग्‍ण दाखल झाले आहेत. 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

जिल्ह्यात साडेतीन लाख चाचण्या 
दरम्‍यान, शुक्रवारी (ता. १३) जिल्ह्यात साडेतीन लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण झाला. आतापर्यंत कोरोना तपासणीसाठीच्‍या तीन लाख ५१ हजार ६४६ चाचण्या केल्या आहेत. यापैकी ९६ हजार ६३६ अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, हे प्रमाण २७.४८ टक्‍के आहे. तर दोन लाख ५४ हजार ४५१ अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ५५९ अहवाल प्रलंबित होते. या अहवालांत नाशिक ग्रामीणचे २४२, नाशिक शहरातील २५० अहवालांचा समावेश आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: less corona patients nashik marathi news