चंदनपुरीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार'चा गजर; कृषिमंत्री दादा भुसेंच्या हस्ते खंडेरायांची महापूजा 

प्रमोद सावंत
Thursday, 28 January 2021

बानुबाईच्या चंदनपुरीत श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त गुरुवारी (ता. २८) कृषिमंत्री दादा भुसे व अनिता भुसे यांच्या हस्ते महापूजा झाली. पौष पौर्णिमेला येथील यात्रोत्सव सुरू होतो.

येसगाव (जि. नाशिक) : बानुबाईच्या चंदनपुरीत श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त गुरुवारी (ता. २८) कृषिमंत्री दादा भुसे व अनिता भुसे यांच्या हस्ते महापूजा झाली. पौष पौर्णिमेला येथील यात्रोत्सव सुरू होतो. कोरोनामुळे यात्रा रद्द झाली असली तरी मानाच्या काठ्या, देवाच्या मुखवट्यांची पालखी मिरवणूक व महापूजा झाली. यात्रोत्सव रद्द झाल्याने खेळणी, उपहारगृह, मनोरंजन, भांडी विक्रेते आदी दुकाने नसली तरी मुहूर्त साधून मल्हार भक्त बहुसंख्येने खंडेरायाच्या चरणी नतमस्तक झाले. 

‘येळकोट येळकोट जय मल्हार' चा गजर

महाराष्ट्रात जेजुरीनंतर खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा चंदनपुरीला भरते. यात्रोत्सव बंद असला तरी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले. मल्हारभक्तांनी सकाळपासूनच चंदनपुरीत गर्दी केली होती. मंदिर परिसरात ‘येळकोट येळकोट जय मल्हार' च्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. भंडारा-खोबरे उधळत वीस ते पंचवीस फुटांच्या मानाच्या काठ्यांची व श्री खंडेराय, म्हाळसादेवी व बानुबाईच्या मुखवट्यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी मिरवणूक मार्गावर सडा रांगोळ्या घालून पालखीची ठिकठिकाणी पूजा केली. ढोलताशे व डीजेचा दणदणाट या वेळी नव्हता. दादा भुसे, अनिता भुसे तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विनोद शेलार व सोनाली शेलार यांच्या हस्ते मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा होऊन आरती झाली. मंदिराबाहेर खंडेरायाची तळी भरण्यात आली. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

वाघ्या मुरळींचा राबता कायम

स्थानिक बेल भंडार व नारळाच्या दुकानांची काही प्रमाणात विक्री झाली. वाहनतळावर मोठ्या प्रमाणात दुचाकी व इतर वाहने लावण्यात आली होती. तुकाराम सूर्यवंशी-भगत यांनी जेजुरीहून मशाल ज्योत आणली. यात्रोत्सव बंद असला तरी कसमादेसह खांदेशमधील भाविक पंधरा दिवसात चंदनपुरीला हजेरी लावून देवदर्शन घेण्याची शक्यता आहे. या काळात तळी व कोटम भरणे, जागरण गोंधळ आदी कार्यक्रम होणार असल्याने वाघ्या मुरळींचा राबता कायम राहणार आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahapuja was held at Chandanpuri by Agriculture Minister Dada Bhuse Nashik Marathi news