मक्याला साडेसतरा क्विंटलचा खोडा! हमीभावाने खरेदी दिवाळीनंतरच; शेतकऱ्यांना भुर्दंड बसणार

संतोष विंचू
Saturday, 14 November 2020

बागायती क्षेत्रात मक्याचे सरासरी एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन निघाले असून, खरेदी होताना साडेसतरा क्विंटलची मर्यादा घातल्याने शेतकरी उर्वरित मका कुठे विकणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विभागाने इतकी कमी सरासरी उत्पादकता ठरवलीच कशी, असा सवाल शेतकरी करत आहेत.

येवला (नाशिक) : जिल्ह्याचे प्रमुख पीक बनलेल्या मक्याचे एकरी २५ ते ३५ क्विंटल, तर सरासरी ३० क्विंटल उत्पादन निघते. मात्र कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत हमीभावाने खरेदी होणाऱ्या मक्याला एकरी साडेसतरा क्विंटल मर्यादा घातल्याने याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, दिवाळीनंतर मका खरेदीला सुरवात होईल, असे दिसते.

तीन हजार ३०० शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण

मक्याची प्रचंड मागणी असल्याने यंदाच्या खरिपात तब्बल दोन लाख ३७ हजार हेक्टरवर मक्याचे पीक घेतले आहे. मक्याला खासगी बाजारात हजार ते एक हजार ३०० रुपये दर मिळत असून, शासकीय हमीभाव मात्र एक हजार ८५० रुपयांचा जाहीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी शासकीय विक्रीसाठी मका ठेवला आहे. २ तारखेपासून जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर मका, बाजरी व ज्वारी विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याने या केंद्रावर दहा हजारांवर शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केले असून, यापैकी तीन हजार ३०० शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
यापूर्वी हमीभावाने मका खरेदी होताना एकरी २० क्विंटलची मर्यादा होती. 

कृषी विभागाला शेतकऱ्यांचा सवाल

यंदा मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिलेल्या सरासरी पीक उत्पादकतेनुसार मका खरेदीला १७.५० क्विंटलची मर्यादा घातल्याने अनेक शेतकऱ्यांना मका विक्रीचा प्रश्न आताच निर्माण झाला आहे. बागायती क्षेत्रात मक्याचे सरासरी एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन निघाले असून, खरेदी होताना साडेसतरा क्विंटलची मर्यादा घातल्याने शेतकरी उर्वरित मका कुठे विकणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विभागाने इतकी कमी सरासरी उत्पादकता ठरवलीच कशी, असा सवाल शेतकरी करत आहेत.

खरेदीला हवे बारदान

ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सर्व संस्थांना खरेदीची परवानगी दिली. मात्र, नोंदणीला गर्दी अन् अद्याप बारदान उपलब्ध नसल्याने मका खरेदी सुरू होऊ शकलेली नाही. तथापि दिवाळीनंतर बारदान उपलब्ध होणार असून, काही संस्थांकडे गत हंगामातील जुने बारदान शिल्लक असल्याने त्यांना खरेदीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार देवळा व चांदवड या दोन तालुक्यांत मका खरेदी सुरू झाली असून, उर्वरित केंद्रांवर दिवाळीनंतरच मका खरेदी सुरू होणार आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

यंदा पावसाने व निसर्गानेही साथ दिल्याने मक्याचे उत्पादन चांगले आले आहे. काही शेतकऱ्यांनी तर एकरी ३० क्विंटलपर्यंत मका पिकवला असून, साडेसतरा क्विंटलच्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून, जास्तीचा मका कमी भावाने विक्री करावा लागणार आहे. त्यामुळे एकरी २२ ते २५ क्विंटलची मर्यादा देऊन मका खरेदी व्हायला हवी, यासाठी पाठपुरावा करणार आहे. - आमदार किशोर दराडे, संचालक, जिल्हा बँक
 

चालू हंगामासाठी बारदान उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत संस्थांकडे उपलब्ध बारदान किंवा गरजेनुसार शेतकऱ्यांकडील जुने बारदानातही धान्य खरेदी होणार असून, बारदानाअभावी धान्य खरेदी प्रभावित होणार नाही, अशा सूचना संस्थांना दिल्या आहेत. दोन तालुक्यांत खरेदी सुरू झाली असून, जिल्ह्यात दिवाळीनंतर खरेदीला सुरवात होईल. - विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

आजपर्यंतची ऑनलाइन नोंदणी
खरेदी केंद्र - मका - बाजरी - ज्वारी

सिन्नर - ३७६ - ०० - १
येवला - ५०३ - १२९ - ३
लासलगाव - ११४ - ०० - ००
चांदवड - २४६ - ०० -००
मालेगाव - ६९९ - ४ - ३७
सटाणा - ३५० - ०० - ००
नामपूर - १२५ - २ - १
देवळा - ४६७ - २८ - २
नांदगाव - ४२६ - १०३
एकूण - ३,३०६ - २६६ - ४४

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

भरडधान्य खरेदीची मर्यादा

मका : १७.५० क्विंटल प्रतिएकर
ज्वारी : सात क्विंटल प्रतिएकर
बाजरी : ६.५० क्विंटल प्रतिएकर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maize crop purchase only after Diwali nashik marathi news