भुजबळांच्या मध्यस्थीशिवाय 'ही' पाणीयोजना पुढे सरकणार नाही...मनमाडकरांमध्ये कुजबूज

2manmad.jpg
2manmad.jpg

नाशिक : (मनमाड) रेल्वेच्या जंक्‍शनसोबतच पाणीटंचाईचे शहर अशीही मनमाडची ओळख आहे. हा शिक्का पुसला जाण्यासाठी अशोक परदेशी यांनी मनमाड बचाव कृती समितीमार्फत उच्च न्यायालयात पाणीप्रश्‍नी याचिका दाखल केली. त्यानंतर विधानसभा निवडणुका, महाविकास आघाडी सरकार सत्तास्थापना आणि आता कोरोना महामारीच्या कचाट्यात ती सापडली आहे.

मनमाडकर करंजवन जलवाहिनीच्या प्रतीक्षेत 

करंजवन धरणावर जॅकवेल बांधण्यासाठी जागेची पाहणी, निवड झाली. वाघदर्डी धरण परिसरात चार एकर जागा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पालिकेची शिवसेनेची एकहाती सत्ता असलेले गटनेते गणेश धात्रक, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी संबंधित विभागाकडून तांत्रिक फीमधील तीन कोटींचे दहा हप्ते करून घेत सध्या 30 लाखांचे तीन हप्तेदेखील भरले. मात्र योजना अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत कायम आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान मनमाडकरांना शब्दही दिला आहे.

अन्य योजनांचे जे झाले तेच या योजनेचेही

योजनेसाठी असलेला 45 कोटींच्या तांत्रिक फीपोटीचा निधी इंधन कंपन्यांच्या सीआरएस फंडातून उपलब्ध करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी प्रयत्न करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनी यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र देत योजनेस निधी उपलब्ध करून देण्यासाठी गळ घातली. मात्र अन्य योजनांचे जे झाले तेच या योजनेचेही झाले. 

प्रतीक्षा भुजबळांच्या वरदहस्ताची 

ज्यांनी आश्‍वासन दिले तेच मुख्यमंत्री, आमदारही शिवसेनेचे, पालिकेत सत्ताही शिवसेनेची असे असताना पाणीयोजनेचे घोडे अडते कुठे याचा मागोवा घेतला असता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्या वरदहस्ताशिवाय ही पाणीयोजना पुढे सरकूच शकत नाही अशी कुजबूज मनमाडकरांमध्ये आहे. मनमाडचा पाणीप्रश्‍न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 

करंजवन योजनेच्या संदर्भात बरेच काम पुढे गेले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांनी प्रयत्न करत ही योजना तडीस न्यावी. - अशोक परदेशी, याचिकाकर्ते 

करंजवन योजनेच्या संदर्भात प्रस्ताव जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठांकडे पाठविला आहे. पालिकेला भरावे लागणारे तीन कोटींचे दहा हप्ते करून त्यातील तीस लाखांचे तीन हप्ते भरले आहेत. शासनाकडून अंतिम मंजुरी येणे महत्त्वाचे आहे. - डॉ. दिलीप मेनकर, मुख्याधिकारी 

मनमाड शहराचा विकास केवळ पाण्यामुळे अडला आहे. पाणीटंचाईने शहराला बदनाम केले तसे विकासालाही खीळ घातली. करंजवन पाणीयोजना मंजूर होणे गरजेचे आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून योजनेला मंजुरी देत निधी उपलब्ध करून द्यावा. ही योजना मनमाड शहराच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. - संजय कटारे, समाजसेवक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com