उच्च न्यायालयात "मराठी'च न्यायाच्या प्रतीक्षेत! 

नरेश हळणोर : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

जनमानसाची आणि तळागाळापर्यंत मराठी भाषेचा वावर असतानाही न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेला मान्यता नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून न्यायालयीन कामकाज इंग्रजीमध्ये व्हायचे. स्वातंत्र्यानंतरही ते इंग्रजीतच होत होते. त्यामुळे कामकाज रूक्ष आणि पक्षकारांच्या समजण्यापलीकडे असल्याने न्यायालयाकडे जनसामान्यांचा फारसा ओढा नव्हता. या संदर्भात, महाराष्ट्र-गोवा वकील संघाने कित्येक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर उच्च न्यायालय व संलग्न खंडपीठ वगळता खालच्या न्यायालयांत मराठी भाषेला मान्यता मिळाला. त्यामुळे युक्तिवादासह न्यायालयीन कामकाज मराठीत होऊ लागले. एवढेच नव्हे, तर पक्षकारांनाही त्यांच्या खटल्यांचे तपशील वा निकाल मराठीमध्ये उपलब्ध झाले. परिणामी, जनसामान्यांना न्यायालयीन कामकाजाची माहिती होऊन त्यांच्यात न्यायाची आशा निर्माण झाली. 

नाशिक : पक्षकारांच्या सोयीसाठी न्यायालयीन कामकाज अधिक सहज आणि सुलभ व्हावे, या एकमेव हेतूने महाराष्ट्रातील उच्च न्यायालय व संलग्न खंडपीठ वगळता खालच्या न्यायालयांमध्ये मराठी भाषेत कामकाज चालते. याचप्रमाणे उच्च न्यायालय व संलग्न खंडपीठांमध्येही मराठी भाषेतच कामकाज व्हावे, यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र-गोवा वकील संघाकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यास अद्याप यश येऊ शकलेले नाही. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती परराज्यातील असल्यास त्यांना भाषेचा अडसर सतावण्याची शक्‍यता असल्याने अद्यापही "मराठी' भाषेतील न्यायालयीन कामकाज होत नाही. मात्र, तरीही वकील संघाकडून लढा सुरूच आहे. 

पाठपुरावा सुरूच : अमराठी न्यायमूर्तींना भाषेचा अडसर 

जनमानसाची आणि तळागाळापर्यंत मराठी भाषेचा वावर असतानाही न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेला मान्यता नव्हती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून न्यायालयीन कामकाज इंग्रजीमध्ये व्हायचे. स्वातंत्र्यानंतरही ते इंग्रजीतच होत होते. त्यामुळे कामकाज रूक्ष आणि पक्षकारांच्या समजण्यापलीकडे असल्याने न्यायालयाकडे जनसामान्यांचा फारसा ओढा नव्हता. या संदर्भात, महाराष्ट्र-गोवा वकील संघाने कित्येक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर उच्च न्यायालय व संलग्न खंडपीठ वगळता खालच्या न्यायालयांत मराठी भाषेला मान्यता मिळाला. त्यामुळे युक्तिवादासह न्यायालयीन कामकाज मराठीत होऊ लागले. एवढेच नव्हे, तर पक्षकारांनाही त्यांच्या खटल्यांचे तपशील वा निकाल मराठीमध्ये उपलब्ध झाले. परिणामी, जनसामान्यांना न्यायालयीन कामकाजाची माहिती होऊन त्यांच्यात न्यायाची आशा निर्माण झाली. 

पक्षकारांना भाषेचा मोठा अडसर

असे असले, तरी मुंबई उच्च न्यायालय व संलग्न खंडपीठांमध्ये मात्र अद्यापही मराठी भाषेत कामकाज होत नाही. खालच्या न्यायालयाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठी पक्षकाराला उच्च न्यायालय वा संलग्न खंडपीठाकडे दाद मागावी लागते. अशा वेळी पक्षकारांना भाषेचा मोठा अडसर सतावतो. उच्च न्यायालयातील कामकाजही मराठी भाषेतच व्हावे, पक्षकारांना खटल्याची माहिती मराठीतून मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 

अमराठी न्यायमूर्तींना अडचण 
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व जिल्हा सत्र न्यायालयांतील न्यायाधीश बहुतांशी महाराष्ट्रातीलच असतात. उच्च न्यायालय व संलग्न खंडपीठांतील न्यायमूर्तींमध्येही काही अमराठी असतात. त्यांना भाषेचा अडसर सतावण्याची शक्‍यता गृहीत धरून "मराठी'त कामकाज होत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात इंग्रजी भाषेलाच आजही प्राधान्य दिले जाते. तरीही मराठी भाषेला उच्च न्यायालयात मान्यता मिळणार नाही असे नाही. घटनेत दुरुस्ती करण्यासंदर्भात वकील संघटनेकडून पाठपुरावा सुरू आहे. 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

उच्च न्यायालयीन कामकाजही मराठी व्हावे 

न्यायालयीन कामकाज मराठीत होऊ लागले, त्याचा निश्‍चितच पक्षकारांना लाभ झालेला आहे. उच्च न्यायालयीन कामकाजही मराठी व्हावे, यासाठी वकील संघटनेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे, तसेच अमराठी न्यायमूर्तींना येणाऱ्या भाषेच्या अडसराबाबत पर्याय उपलब्ध करावा लागेल. त्यासाठी पाठपुरावा सुरूच असून, लवकरच त्यात यश येईल, अशी अपेक्षा आहे. -ऍड. जयंत जायभावे, सदस्य, विधी विभाग, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल.  

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Marathi" language justice awaits in High Court Nashik Marathi News