esakal | वैद्यकीयच्या परीक्षा दोन टप्प्यांत; २६ ऑक्‍टोबरपासून उन्‍हाळी सत्र परीक्षांना सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

MEDICAL

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या लेखी परीक्षा घेणे आवश्‍यक असल्‍याने महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या निर्णयाकडे लक्ष लागून होते. नुकतेच विद्यापीठाने कार्यालयीन पत्र जारी करून उन्‍हाळी सत्र २०२० च्‍या परीक्षांच्‍या संभाव्‍य वेळापत्रकाची घोषणा केली आहे. दोन टप्प्‍यांमध्ये या परीक्षा पार पडणार आहेत.

वैद्यकीयच्या परीक्षा दोन टप्प्यांत; २६ ऑक्‍टोबरपासून उन्‍हाळी सत्र परीक्षांना सुरवात

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विद्यापीठाच्‍या विविध अभ्यासक्रमांच्‍या परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले आहे. उन्‍हाळी २०२० सत्राच्‍या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवीपूर्व अभ्यासक्रम व पदविका व पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या वेळापत्रकाचा समावेश आहे. त्‍यानुसार २६ ऑक्‍टोबरपासून लेखी परीक्षांना सुरवात होणार आहे. दोन टप्प्‍यांमध्ये लेखी परीक्षा होतील.

२६ ऑक्‍टोबरपासून उन्‍हाळी सत्र परीक्षांना सुरवात

सध्याच्या कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे सर्वच स्‍तरावरील परीक्षा प्रभावित झाल्‍या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांच्‍यामार्फत वेळोवेळी परीक्षांसंदर्भातील धोरण जाहीर केले आहे. त्‍यानुसार अंतिम वर्षाच्‍या परीक्षा घेणे बंधनकारक केले होते. तर अंतिम वर्ष, अंतिम सत्र पूर्व असलेल्‍या वर्ष, सत्राच्‍या परीक्षा न घेता कामगिरीच्‍या आधारे गुणावारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्‍यानुसार विविध विद्यापीठांनी निश्‍चित केलेल्‍या गणितीय सूत्रानुसार अंतिम सत्र, अंतिम वर्ष वगळता अन्‍य परीक्षांचे निकाल जाहीर केले होते.

वैद्यकीयच्या परीक्षा दोन टप्प्यांत

मात्र, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या लेखी परीक्षा घेणे आवश्‍यक असल्‍याने महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या निर्णयाकडे लक्ष लागून होते. नुकतेच विद्यापीठाने कार्यालयीन पत्र जारी करून उन्‍हाळी सत्र २०२० च्‍या परीक्षांच्‍या संभाव्‍य वेळापत्रकाची घोषणा केली आहे. दोन टप्प्‍यांमध्ये या परीक्षा पार पडणार आहेत. यापैकी पहिल्‍या टप्प्‍यातील परीक्षा २६ ऑक्‍टोबर ते ९ नोव्‍हेंबर या कालावधीत होतील. यादरम्‍यान जुन्‍या अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमाच्‍या परीक्षांसह अन्‍य विविध सात अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा होणार आहेत. यात पदवी, पदव्‍युत्तर पदवी व पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

दुसरा टप्‍पा नोव्‍हेंबरअखेरीस
या नियोजनानुसार दुसऱ्या टप्प्‍यात बहुतांश अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा घेतल्‍या जातील. लेखी परीक्षेचा हा टप्पा २१ नोव्‍हेंबर ते १४ डिसेंबरदरम्‍यान पार पडेल. या कालावधीत दंतशास्‍त्रातील विविध वर्ष, आयुर्वेदशास्‍त्रातील बीएएमएस, युनानीतील बीयूएमएस, होमिओपॅथीचे बीएचएमएच यांसह एमबीए (हेल्‍थ केअर ॲडमिनिस्‍ट्रेशन), फिजिओथेरपी, ऑक्‍युपेशनल थेरपी, स्‍पीच थेरपी, बी.एस्सी. (नर्सिंग) आदी अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा होतील.
 

संपादन : रमेश चौधरी