esakal | थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना
sakal

बोलून बातमी शोधा

chita nandgaon.jpg

वाखारी (ता. नांदगाव) येथील जेऊर शिवारातील चव्हाण कुटुंबीयांच्या हत्याकांडाने पंचक्रोशी हादरली आहे. या हत्याकांडाने मालेगावजवळील सोयगाव शिवारातील सुपडू पाटील हत्याकांडाच्या स्मृती जाग्या झाल्या. विशेष म्हणजे वाखारी येथेही त्याच दरम्यान (१९९६) एका महिलेची हत्या झाली होती. त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना आहेत. 

थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : वाखारी (ता. नांदगाव) येथील जेऊर शिवारातील चव्हाण कुटुंबीयांच्या हत्याकांडाने पंचक्रोशी हादरली आहे. या हत्याकांडाने मालेगावजवळील सोयगाव शिवारातील सुपडू पाटील हत्याकांडाच्या स्मृती जाग्या झाल्या. विशेष म्हणजे वाखारी येथेही त्याच दरम्यान (१९९६) एका महिलेची हत्या झाली होती. त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना आहेत. 

थरारक! सुपडू पाटील हत्याकांडच्या त्या स्मृती 

कोजागरीला सुपडू पाटील, त्यांची वृद्ध आई, पत्नी पुष्पलता, हॉकी खेळाडू असलेला मुलगा राकेश व मुली पूनम आणि दीदी यांचा सोयगाव शिवारातील राहत्या बंगल्यात निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सुपडू पाटील यांचे बंधू प्रकाश व पुतण्या संदीप यांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात हा गुन्हा सिद्धही झाला होता. त्यानंतर संदीपची उच्च न्यायालयात मुक्तता झाली. तर प्रकाश पाटील यांना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. चांगल्या वर्तणुकीमुळे नंतर त्यांची जन्मठेपेची शिक्षाही पूर्ण झाली आहे. शुक्रवारी (ता. ७) वाखारी येथील हत्याकांडानंतर सोयगाव शिवारात कोजागरीच्या काळरात्री घडलेल्या हत्याकांडाचीच चर्चा होती. या प्रकरणात पोलिसांनी शिताफीने तपास करून ते उघडकीस आणले होते. वाखारी येथील हत्याकांडात सामान्य कुटुंबातील रिक्षाचालक असलेल्या समाधानचा पूर्ण परिवार संपविण्यात आला. मोजक्या शेतीत गुजराण करून रिक्षा चालवत समाधान आई वडिलांसह पत्नी व मुलांचे पालनपोषण करत होता. त्याचा भाऊ सैन्यदलात आसाम येथे सीमेवर रक्षण करीत असताना, या कुटुंबावरच ही वेळ यावी, हे मोठे दुर्दैव. या हत्याकांडाने संपूर्ण परिसर चक्रावून गेला आहे. हत्याकांडाचे नेमके कारण काय? पोलिस गुन्हेगारांना केव्हा जेरबंद करणार, याचीच उत्सुकता आहे. तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > ब्रेकिंग : नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

मृत महिलेवर अत्याचार नाही 
समाधान चव्हाण कुटुंबीयांच्या हत्याकांडात गुन्हेगारांना तातडीने अटक करावी. पोलिसांनी यासाठी किती दिवसात कारवाई करणार, याची खात्री द्यावी. दोषींना फासावर लटकवावे, या मागणीसाठी वाखारी ग्रामस्थांनी येथील सामान्य रुग्णालयाच्या आवारातील शवचिकित्सा गृहासमोर ठिय्या मांडला. कृषिमंत्री दादा भुसे, शिक्षक नेते संजय चव्हाण यांनी, ग्रामस्थांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. घटना दुर्दैवी आहे. तपासात प्रगत तंत्रज्ञानाची मदत होत आहे. पोलिसांना थोडा वेळ द्यावा. गुन्हेगारांचा छडा निश्‍चित लागेल, अशी समजूत घातल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला. सायंकाळी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले, महिला पोलिस अधिकारी, चव्हाण कुटुंबीयांशी संबंधित महिला व महिला बालकल्याणचे अधिकारी यांच्या उपस्थितीत इनकॅमेरा शवचिकित्सा करण्यात आली. मृत महिलेवर अतिप्रसंग वा अत्याचार झाला नसल्याचे यातून स्पष्ट झाल्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांनी सांगितले. संपूर्ण शवचिकित्सा अहवालानंतरच काही बाबी उघडकीस येण्यास मदत हाेईल.  

हेही वाचा : दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच

संपादन - ज्योती देवरे