जेव्हा जाटपाडे शिवारात अचानक लाल दिव्याची गाडी थांबली! शेतकऱ्यांच्या मनात शंका कुशंका

भगवान हिरे
Tuesday, 20 October 2020

मालेगाव नांदगाव रस्त्यावर जाटपाडे शिवारात अचानक लाल दिव्याची गाडी थांबली. शेतकरी हरिभाऊ आहिरे यांनी गाडीकडे पाहिले आणि एकदम अस्वस्थ झाले का थांबली असावी? गाडी काय चुकले आपले? असे त्यांच्या मनात शंका कुशंका येऊ लागल्या.  

साकोरा (जि.नाशिक) : मालेगाव नांदगाव रस्त्यावर जाटपाडे शिवारात अचानक लाल दिव्याची गाडी थांबली. शेतकरी हरिभाऊ आहिरे यांनी गाडीकडे पाहिले आणि एकदम अस्वस्थ झाले. का थांबली असावी गाडी? काय चुकले आपले? असे त्यांच्या मनात शंका कुशंका येऊ लागल्या.  

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, गाऱ्हाणी ऐकली
आणि तेवढ्यात त्या लाल दिव्याच्या गाडीतून उतरले कृषी मंत्री दादा भुसे...मंत्री उतरून थेट कोबीच्या शेतात पाहणीसाठी गेले आणि कोबीच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोबीचे ७५ टक्के नुकसान झाले असून आमच्या हातात अफाट खर्च करून फक्त कसे बसे २५ टक्के उत्पन हाती आले. खर्चही वसूल झाला नाही. तरी आमचे जे काही नुकसान झाले त्यांचा पंचनामा करावा. हजारो रुपये खर्च करून लाल कांदा लावला. परतीच्या पावसामुळे पूर्ण जमीनदोस्त झाला. उन्हाळी कांद्याचे रोप खराब झाले, मका पिकात अजूनही पाणी आहे कापता येत नाही, कापूस खराब झाला अशा प्रकारे मंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी नुकसानीचे पाढेच वाचले.

कृषी अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना

कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या आहेत. ते लवकरच पंचनामा करतील. तसेच आपण पिकवलेला परिसरातील ताजा भाजीपाला आपणच रस्त्यावर विकला तर आपल्याला त्यातून दुपटीने पैसे मिळतील, ग्राहकाला ताजा भाजीपाला मिळेल आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाला रोजगार मिळेल असे त्यांनी शेतकरी बांधवाना सांगितले.

परतीच्या पावसामुळे कोबी पिकाला हजारो रुपये खर्च करून फक्त पंचवीस टक्के पीक आमच्या हातात आले आहे. आमचया पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी."- हरिभाऊ आहिरे, शेतकरी,जाटपाडे

"कृषी अधिकारी यांना नुकसानीच्या पंचनाम्याच्या सूचना केल्या असून लवकरच पंचनामे करतील.- दादा भुसे कृषी मंत्री

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of Agriculture give Instructions to investigate damage nashik marathi news