ऊस शेती जळीत घटनेस महावितरणच जबाबदार! चौकशी अहवालात ठपका, कारवाईची प्रतीक्षा 

साहेबराव काकुल्ते
Sunday, 22 November 2020

२०१८ पासून नुकसानग्रस्त शेतकरी शेतातील कामासंदर्भात महावितरण कंपनीच्या डांगसौंदाणे कार्यालयाशी पाठपुरावा करत होते. मात्र महावितरण कंपनीच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले.

नाशिक/डांगसौंदाणे : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे डांगसौंदाणे (ता. बागलाण) येथील दोघा शेतकऱ्यांचा नऊ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या ऊस शेती जळीत घटनेस महावितरण कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका विद्युत निरीक्षण कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय.

महावितरणचीच चूक

डांगसौंदाणे येथील शेतकरी दिगंबर बोरसे यांचा सात एकर ऊस आणि ठिबक सिंचन, तर वंदना काकुळते यांचा दोन एकर ऊस ४ नोव्हेंबरला शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. यामध्ये या दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या जळीत उसाचा पंचनामा करून विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल महावितरण कंपनीला सादर करण्यात आला असून, यात महावितरणची चूक असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता या चौकशी अहवालाच्या आधारावर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कारवाई होणे अपेक्षित ​

२०१८ पासून नुकसानग्रस्त शेतकरी शेतातील कामासंदर्भात महावितरण कंपनीच्या डांगसौंदाणे कार्यालयाशी पाठपुरावा करत होते. मात्र महावितरण कंपनीच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही घटना घडल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. घटनेला एक महिना होत आला आहे; मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

माझ्याकडे अद्याप विद्युत निरीक्षक कार्यालयाचा अहवाल प्राप्त झाला नाही. मात्र चौकशी अहवाल आल्यानंतर घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, शिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई देण्याचा आमचा प्रयत्न राहील. 
-रमेश सानप, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी, मालेगाव 

डांगसौंदाणे गावातील ऊस जळीत शेतीस मी भेट दिली असून, घटनेची माहिती घेतली आहे. आता चौकशी अहवालाच्या आधारावर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मी प्रयत्नशील आहे. 
-दिलीप बोरसे, आमदार 
 
माझ्या शेतातील ऊस जळीत घटनेस महावितरण जबाबदार आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने लवकरात लवकर मला झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. 
-दिगंबर बोरसे, नुकसानग्रस्त शेतकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL is responsible for the burning of sugarcane nashik marathi news