भूमिगत पार्किंगसाठी महापालिकेला हवे स्टेडियम; महापौरांचे पालकमंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

भूमिगत वाहनतळासाठी सुमारे १२१ कोटी रुपयांचा खर्च लागेल. भूमिगत पार्किंगसाठी स्मार्टसिटी कंपनीने जिल्हा परिषद व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. परंतु अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यापार्श्‍वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे पत्रव्यवहार केला.

नाशिक : दिवसागणिक वाढत असलेल्या शहरात मुख्य बाजारपेठेत पार्किंगची समस्या बिकट होत असल्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जागेत भूमिगत पार्किंग प्रकल्प उभारण्यासाठी जागा मिळावी, यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे.

महापौरांचा पालकमंत्र्यांकडे पत्रव्यवहार

शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहतूक कोंडीबरोबरच प्रदूषणाच्या महत्त्वाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. स्मार्टसिटीमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. त्यामुळे शहर स्मार्ट होण्यासाठी अद्ययावत पार्किंग असणे देखील गरजेचे आहे. यातून शहराच्या सौंदर्यात भर पडेल. स्मार्टसिटी कंपनीने जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती स्टेडियमच्या जागेत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर दोन मजली भूमिगत वाहनतळाचा आराखडा तयार केला आहे. भूमिगत वाहनतळासाठी सुमारे १२१ कोटी रुपयांचा खर्च लागेल. भूमिगत पार्किंगसाठी स्मार्टसिटी कंपनीने जिल्हा परिषद व जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. परंतु अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यापार्श्‍वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे पत्रव्यवहार केला.

दिल्लीच्या धर्तीवर स्टेडियम

शहराची वाढती लोकसंख्या व त्यातून वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा परिषदेच्या स्टेडियमच्या जागेवर भूमिगत दोन मजली पार्किंग उभारल्यास जवळपास ८०० चारचाकी वाहनांचा पार्किंगचा प्रश्न सुटेल. वाहनतळाच्या वरच्या भागात दिल्लीच्या धर्तीवर अद्ययावत स्टेडियम तयार करता येणे शक्य आहे. तसे झाल्यास शहराच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होऊन पार्किंगचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा पालकमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या पत्रात महापौर कुलकर्णी यांनी केला.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation wants stadium for parking - satish kulkarni nashik marathi news