नायगव्हाण डोंगरावरील न कोरलेल्या लेणींचे गूढ! लवकरच इतिहास पुढे येण्यास मदत 

आनंद बोरा
Tuesday, 3 November 2020

नाशिकमधील अनेक किल्ले-डोंगरावर लेण्या आहेत. पण त्यांचा अभ्यास झालेला नाही. पुरातत्त्व विभागाकडून सांभाळण्याचे काम सुरू आहे. या विभागाने अशा न कोरलेल्या लेण्यांचा अभ्यास केल्यास त्याचा इतिहास पुढे येण्यास मदत होणार आहे.

नाशिक : येवला-मालेगाव रस्त्यावरील अंकाई गावाजवळ अंकाई-टंकाई किल्ले आहेत. यातील अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी दक्षिण बाजूस सात जैन लेणी आहेत. अप्रतिम कोरीव काम असलेल्या या लेणी नवव्या शतकातील आहेत. लासलगाव येथील लेणी अभ्यासक संजय बिरार या परिसरातील गावे, डोंगर फिरत असताना त्यांना या लेणींपासून वीस किलोमीटरवरील नायगव्हाण गावाजवळील डोंगरावर न कोरलेल्या लेणी दिसून आल्या. 

अंकाई-टंकाई किल्ल्यांवरील लेणींशी साम्य; संजय बिरार यांनी शोधली लेणी 
सह्याद्रीच्या काळ्या कातळांमधून निर्माण झालेल्या देशातील एक हजार लेणींपैकी ८०० लेणी या महाराष्ट्रात आहेत. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या लेण्या असून, जैन लेणी पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात. राज्यात अनेक ठिकाणी अशा न कोरलेल्या लेण्या दिसतात. त्याकाळी लेणी कोरताना दगड खराब असेल, राजाश्रय कमी पडला असेल अथवा आर्थिक कारणांमुळे त्या ठिकाणी लेणी अर्धवट सोडून दिल्याचे दिसून येते. नायगव्हाणच्या अर्धवट लेण्या या अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लेण्यांशी मिळत्या-जुळत्या असल्याचे श्री. बिरार यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच त्या लेणींची मापे घेतली. कोरलेल्या तीन कप्प्यांची लांबी १४ फूट पाच इंच होती. दोन कप्प्यांमधील अंतर अनुक्रमे २१ आणि १६ इंच होते. ही मापे घेऊन अंकाईवरील लेणी क्रमांक दोनची मापे घेतली. ती तंतोतंत सारखी असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे अशी लेणी एकतर त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न झाला असावा अथवा तेथे अडचण आल्याने अंकाई येथे लेणी बांधल्या गेल्या असाव्यात, असा अंदाज बांधण्यात आलाय. 

इतिहास पुढे येण्यास मदत
या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. ग्रामस्थांनी पूर्वी आमचे गाव त्या डोंगरावर वसलेले असल्याचे सांगितले. या डोंगरावर घरांचे अवशेष असल्याचेदेखील दिसून आले. नाशिकमधील अनेक किल्ले-डोंगरावर लेण्या आहेत. पण त्यांचा अभ्यास झालेला नाही. पुरातत्त्व विभागाकडून सांभाळण्याचे काम सुरू आहे. या विभागाने अशा न कोरलेल्या लेण्यांचा अभ्यास केल्यास त्याचा इतिहास पुढे येण्यास मदत होणार आहे. गावामध्ये पुरातन मूर्ती, विरगळदेखील असून, त्यादेखील अस्ताव्यस्त पडल्या आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

मी अनेक वर्षांपासून लेणी, मंदिरांचा अभ्यास करत आहे. गावात दुर्मिळ मूर्ती आहे, असे समजल्यावर तेथे गेल्यावर समोरील नायगव्हाणच्या डोंगरावर गेलो. डोंगरावर फिरताना मला या न कोरलेल्या लेण्या दिसल्या. त्याची मापे घेऊन मी अभ्यास केला आणि त्याचा संबंध अंकाईच्या जैन लेणींशी असल्याचे मला दिसले. त्याकाळच्या या प्रांतातातील धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक माहिती ही लेणींमधून मिळत असते. यासाठी लेण्यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. -संजय बिरार, लेणी अभ्यासक  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mystery of caves at Naigavan mountain nashik marathi news