कुंभनगरीचा कोंडमारा! चिमुकल्यांच्या भविष्याची चिंता...जिवावर उदार होऊन करताय काम!

 123
123
Updated on

नाशिक : गॅरेज मेकॅनिक, रंगकाम मजूर, बांधकाम मजूर असे हातावरचे पोट असलेला कष्टकरी समाज नाईकवाडीपुरा व सभोवतालच्या भागात वास्तव्यास आहे. अतिशय दाट वस्तीच्या या परिसरात बहुतांश घरांत चिमुकले खेळतात, बागडतात. मजुरांची मोठी संख्या लक्षात घेता इथं सकाळी मजुरांचा बाजारही भरतो. पण, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा हॉटस्पॉटमधून हा परिसर चर्चेत आलाय. लॉकडाऊन काळात सर्वकाही ठप्प असल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला हा मजूरवर्ग चिमुकल्यांच्या भविष्याच्या चिंतेत जिवावर उदार होऊन बाहेर पडतोय.

नाईकवाडीपुऱ्यात कोरोनाचा फैलाव

जुने नाशिकमधील कुंभारवाडा, गंजमाळ परिसरातही कष्टकऱ्यांना रोजीरोटीच्या चिंतेत जोखीम पत्कारायला भाग पाडत आहे. या परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा पन्नासपर्यंत पोचला आहे. नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, काझीची गढीसह जुने नाशिक परिसरातील गंजमाळ व अन्य परिसरात कोरोनाचा फैलाव होतो आहे. बघता बघता परिसरात कोरोनाचा इतका फैलाव कसा झाला, हा प्रश्‍न चक्रावरणारा आहे. नाईकवाडीपुरा भागातील बहुतांश कुटुंबांचे हातवरचे पोट आहे. रंगकाम, गॅरेजवर मदतनीस, बांधकाम क्षेत्रातील मजुरांसह अन्य रोजंदारी कामगार आहेत. लॉकडाउन काळात सर्व व्यवहार ठप्प होते. अद्यापही अपेक्षित उठाव मिळालेला नाही. अशात दाट वस्ती असलेल्या नाईकवाडीपुऱ्यात कोरोनाचा फैलाव वाढला. प्रत्येक घरात एक, दोन लहान मुलं असून, कुटुंब आर्थिक अडचणीत सापडली आहेत.

39 बाधित, चौघांचा मृत्यू

नाईकवाडीपुऱ्यात पहिला रुग्ण निघाल्यानंतर पन्नास घरे सील केली होती. सद्यःस्थितीत परिसरात 39 बाधित आढळले असून, त्यापैकी चार लहान मुले आहेत. 6 जूनला परिसरातील रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांच्या कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमधील संशयित 38 पैकी 19 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा असल्याचे आढळले. एकाच कुटुंबातील तीन मृत्यूसह या परिसरात आतापर्यंत एकूण चार रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

कुंभारवाडा परिसरातील कुटुंब, काझीची गढीचेही दोघे बाधित

नाईकवाडीपुरा परिसराला लागून असलेल्या कुंभारवाडा परिसरातील साई मंदिरामागील परिसरातील कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. येथील ज्येष्ठ नागरिक पेन्शनसह अन्य कारणांसाठी शहर परिसरात फिरायचे. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्यांनाही कोरोना झाला असल्याचे निदर्शनास आले. यात एक सहा महिन्यांची चिमुकलीचा समावेश आहे. तर परिसरात एक मृत्यू झालाय. काझीची गढी येथील बाह्य भागातही तीन रुग्ण आढळून आले आहेत.

अहोरात्र सर्वेक्षणाचे काम सुरू

नाईकवाडीपुऱ्यात रुग्ण आढळल्यानंतर युद्धपातळीवर सर्वेक्षण कार्य सुरू आहे. यात ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांसह सर्वांची आरोग्य तपासणी केली जाते आहे. यात शरीराचे तापमान, रक्‍तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण आदी तपासणी केली जाते आहे. तर संधिग्धांना रंगारवाडा शाळेत तैणात पथकाच्या निगराणीत औषधोपचार दिले जात आहेत. आतापर्यंत 832 व्यक्‍तींचे स्क्रीनिंग झाले आहे.

सम-विषमचे सूत्र गंजमाळसाठी चिंतेचे

गर्दी टाळण्यासाठी शहरातील प्रमुख बाजारपेठांतील दुकाने सम-विषम सूत्रानुसार खुली केली जाणार आहे. मेन रोड, शिवाजी रोड यांसह अन्य परिसरातील दुकानांमधील बहुतांश कामगार गंजमाळ व सभोवतालच्या परिसरात वातव्यास आहेत. अशात एक दिवस दुकान बंद राहिल्याने हे सर्व घरी थांबून होणाऱ्या दाटीवाटीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. तसेच कोरोनाच्या भीतीमुळे अनेक घरांत मोलकरणींना कामावर न येण्यास सांगितल्याने या परिसरात राहाणाऱ्या काही कष्टकरी महिलांनाही घरी बसून राहाण्याची वेळ ओढावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com