स्वच्छ भारत अभियानात नाशिकचे तारे जमीनवरच! 'या' कारणांमुळे रेटिंग पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या नाशिक महापालिकेला तीनवरून एक स्टारवर समाधान मानावे लागल्यानंतर घसरत्या रेटिंगची कारणमीमांसा सुरू झाली आहे. 

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या नाशिक महापालिकेला तीनवरून एक स्टारवर समाधान मानावे लागल्यानंतर घसरत्या रेटिंगची कारणमीमांसा सुरू झाली आहे. नाशिकला फाइव्ह स्टार रेटिंग मिळेल असे अपेक्षित होते. परंतु केंद्रीय मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या रेटिंगमध्ये नाशिकला फक्त एक स्टार मिळाला. 'या' कारणांमुळे रेटिंग पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे बोलले जात आहे.

नाशिकला फक्त एक स्टार

केंद्र सरकारतर्फे पाच वर्षांपासून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जाते. या अभियानांतर्गत जानेवारीत स्वच्छतेच्या स्पर्धेतील शहरांमध्ये केंद्राचे पथक दाखल होते. हागणदारीमुक्त, घनकचरा व्यवस्थापन या बाबी पथकाकडून तपासल्या जातात. त्यावरून शहरांचे रेटिंग ठरविले जाते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय निरीक्षक पथक नाशिक शहरात दाखल झाले होते. पथकाकडून दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, कचरामुक्त अभियान आदी बाबींची पाहणी करण्यात आली होती. त्या वेळी नाशिक शहराला थ्री स्टार रेटिंग देण्यात आले होते. आता नाशिकला फाइव्ह स्टार रेटिंग मिळेल असे अपेक्षित होते. परंतु केंद्रीय मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या रेटिंगमध्ये नाशिकला फक्त एक स्टार मिळाला. 

नकारात्मक शेरा मारला

महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहराला फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले. नाशिक महापालिकेच्या दृष्टीने धक्कादायक बाब असल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दखल घेत आरोग्य विभागाला एक स्टार रेटिंगच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचना बुधवारी (ता. 20) दिल्या. त्यानुसार प्राथमिक अंदाजानुसार बांधकामांचा कचरा (डेब्रिज) जागोजागी असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार पंचवटी व सिडको भागात घंटागाडी न पोचल्याने अस्वच्छता झाली. त्यामुळे नकारात्मक शेरा मारला गेल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा > BIG BREAKING : एमएचटी-सीईटीच्या तारखा जाहीर; सत्रनिहाय होणार परिक्षा

...मग माशी कुठे शिंकली? 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात केलेल्या पाहणीत राज्य शासनापर्यंत जो अहवाल गेला, त्यात नाशिकची बाजू भक्कम दिसत होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगले फलित मिळण्याची अपेक्षा होती. परंतु एक स्टार आल्याने केंद्रीय पातळीवर डेटा पोचला नसावा, असा संशय आरोग्याधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा > महत्वाची बातमी! जूनमध्ये होणारी सेट परीक्षा पुढे ढकलली...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik is just a star in the Swachh Bharat competition, the primary reasons behind this are being explored nashik marathi news