महत्वाची बातमी! जूनमध्ये होणारी सेट परीक्षा पुढे ढकलली...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी स्टेट इलिजिब्लीटी टेस्ट (सेट) परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यस्तरावर सेट परीक्षेचे नियोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे केले जात असते. बुधवारी (ता.20) यासंदर्भात पुणे विद्यापीठाने निवेदन जारी केले आहे. 

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जानेवारी महिन्यात सेट 2020 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया राबविली होती. 18 जूनला प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) उपलब्ध करून दिले जाणार होते. महाराष्ट्र व गोवा राज्यात येत्या 28 जूनला सेट परीक्षा घेण्याचे नियोजित होते. परंतु कोव्हीड 19 अर्थात कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परीस्थितीच्या पार्श्‍वभुमीवर सेट परीक्षा पुढे ढकण्यात येत आहे.

अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार

या परीक्षेसाठी 1 लाख 11 हजार 106 पात्र परीक्षार्थींची यादी संकेतस्थळावर जारी केलेली होती. परीक्षेची सुधारीत तारीख सध्यातरी जाहीर करण्यात आलेली नाही. सेट परीक्षेचे नियोजन पुढील काळात परीस्थितीचा आढावा घेऊन करण्यात येईल, असे सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. जून महिन्यात परीक्षा होणार असल्याने अनेकांकडून या परीक्षेचा जोरदार अभ्यास सुरू होता.

अभ्यासासाठी आणखी वेळ मिळणार

सेट परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्यांमध्ये प्राध्यापक वर्गाचे लक्षणीय प्रमाण असते. सध्या लॉकडाऊन लागू असल्याने प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांकडून जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी दिला जात होता. राज्यभरात 1 लाखहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ झालेले असल्याने सध्याच्या परीस्थितीत ही परीक्षा घेणे आव्हानात्मक होते. त्यामूळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामूळे उमेदवारांना आता अभ्यासासाठी आणखी वेळ मिळणार आहे. 

हेही वाचा > लॉकडाउनचा येवला बस आगाराला फटका; तब्बल 'इतक्या' कोटींचा तोटा!

युजीसी नेट परीक्षेच्या अर्जासाठी 31 पर्यंत मुदत 

दरम्यान राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या युजीसी-नॅशनल इलिजिब्लीटी टेस्ट (युजीसी-नेट) परीक्षा जून 2020 मध्ये घेण्याचे नियोजित आहे. ही परीक्षादेखील आता पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) यांच्यातर्फे ही परीक्षा घेतली जात असते. युजीसी-नेट परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 मार्चपासून सुरू झालेली आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार 16 मेपर्यंत अर्ज भरण्यास अंतीम मुदत होती. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ दिलेली होती. त्यानुसार आता इच्छुक पात्र उमेदवारांना 31 मेपर्यंत ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरता येणार आहे.

हेही वाचा > रात्री ड्युटीवरून महिला घरी जाताना..वाटेत तिघांनी अडविले..अन् मग....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SET exam postponed due to Corona Nashik Marathi News