esakal | शेतकरी चिंतेत! अहमदाबाद ‘लॉक’मुळे नाशिकचे मार्केट डाउन; ४० टक्के वाहतूक ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

market.jpg

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्यांपैकी सुमारे ४० टक्के माल अहमदाबादला, ४० टक्के माल मुंबईला, तर २० टक्के माल स्थानिक बाजारपेठेत विक्री होतो. त्यामुळे मुंबईप्रमाणेच अहमदाबाद ही नाशिकसाठी मुख्य बाजारपेठ मानली जाते.

शेतकरी चिंतेत! अहमदाबाद ‘लॉक’मुळे नाशिकचे मार्केट डाउन; ४० टक्के वाहतूक ठप्प

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : नाशिकच्या भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुजरातमधील अहमदाबादमध्ये लॉकडाउन करण्यात आल्याने नाशिक बाजार समितीत पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली. परिणामी, पालेभाज्यांचे दर कोसळले असून, बळीराजासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

कोथिंबीर रुपया, काकडी दोन रुपये

मुंबईसह अहमदाबादला नाशिकच्या पालेभाज्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे नाशिकला पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाजीपाल्यांपैकी सुमारे ४० टक्के माल अहमदाबादला, ४० टक्के माल मुंबईला, तर २० टक्के माल स्थानिक बाजारपेठेत विक्री होतो. त्यामुळे मुंबईप्रमाणेच अहमदाबाद ही नाशिकसाठी मुख्य बाजारपेठ मानली जाते. परंतु कोरोनामुळे अहमदाबादमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे पालेभाज्या पाठविता येणार नसल्याकारणाने मालाची प्रचंड आवक वाढली आहे. परिणामी, पालेभाज्यांच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. आता शेतकऱ्यांची भिस्त मुंबईवरच राहणार असून, स्थानिक बाजारपेठेकडेही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. दरम्यान, गावठी कोथिंबीर प्रतिशेकडा १०० ते १,१०० रुपये, चायना कोथिंबीर ५० ते ८५०, मेथी १०० ते ९५०, शेपू २०० ते ९०० व कांदापात एक हजार ते दोन हजार ८०० रुपये असा भाव मिळाला.

लिलावाअभावी कोथिंबीर पडून

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास दोन ते अडीच लाख जुडी आवक झाली होती. पालेभाज्यांची आवक वाढल्याने लिलावासाठी जागा अपुरी पडत आहे. विशेष म्हणजे जवळपास अडीच हजार चायना कोथिंबीर लिलाव न झाल्याने अक्षरशः पडून होती.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

यंदा पालेभाज्या अधिक

नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये सिन्नर, निफाड आणि दिंडोरी या तालुक्यांतून पालेभाज्यांची प्रामुख्याने आवक होत असते. या वर्षी मनमाड, येवला, चांदवड आदी तालुक्यांतही पालेभाज्यांची लागवड वाढली. शिवाय काही महिन्यांपासून कांद्याच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कांदा पिकाऐवजी पालेभाज्या लागवडीकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळेदेखील यंदा आवक वाढली आहे.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

go to top