नाशिकमध्ये मुंबईपेक्षा दहापटींनी एसटीचा महागडा प्रवास! सामान्य प्रवाश्यांच्या खिशाला झळ

st 2.jpg
st 2.jpg

नाशिक : देशात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा चौथा क्रमांक असला, तरी शहराला पुरविल्या जाणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आहेत, त्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वेगवान व गुणवत्तापूर्ण विकासासाठी वाहतूक व्यवस्था भक्कम लागते. राज्य परिवहन महामंडळ नकारात्मक मानसिकतेतून बससेवा चालवत असून, सक्षम वाहतूक व्यवस्था नाशिककरांना देण्यासाठी महापालिकेने तातडीने स्वतःची बससेवा सुरू करण्याची गरज आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी नाशिककरांच्या सेवेत बससेवा रुजू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर असल्याचा परिणाम 
पन्नास वर्षांहून अधिक काळापासून नाशिकमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून शहर बससेवा चालविली जात आहे. सुरवातीला नाशिक रोड ते नाशिक अशा सुरू झालेल्या बससेवेने कालांतराने वाढत्या शहर विस्तारानुसार बसेसेवेचाही विस्तार केला. २०१८ पर्यंत १९६ बसच्या माध्यमातून ५०८ मार्गांवर बससेवा सुरू होती. आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण देत एसटीने सेवा देण्यास नकार देताना महापालिकेने बससेवा सुरू करण्याची अट टाकली. महापालिकेनेही शासनाच्या सूचनेनुसार सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग’ तत्त्वावर तांत्रिक प्रक्रिया पार पडली. परंतु अद्यापही सेवा सुरू होत नसल्याने नाशिककरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर सात महिने शहर बससेवा बंद राहिली. गेल्या आठवड्यात शहर बससेवेने पुन्हा डबल बेल दिली. परंतु आचके खातच सेवा सुरू झाली आहे. जवळपास पावणेदोन लाख नागरिकांची वाहतूक अद्याप एसटी बसमार्फतच होते. मार्चपर्यंत एसटीने १४० बसपर्यंत संख्या घटविली. सध्या नाशिक रोड, पंचवटी, सातपूर व सिडको या प्रमुख मार्गांवरच बस धावत आहेत. त्यामुळे नाशिककरांना सक्षम बसची गरज भासू लागली आहे. 

खिशाला झळ 
शहराचा विस्तार आडव्या पद्धतीने होत असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठ, शैक्षणिक कामासाठी किंवा औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त पोचण्यासाठी बससेवा अत्यावश्यक बाब बनली आहे. भगूरसारख्या ठिकाणाहून महात्मानगर भागात विद्यार्थ्यांना पोचायचे झाल्यास परतीच्या प्रवासासह दोनशे रुपयांचा भुर्दंड बसतो. आडगाव, म्हसरूळमधून सातपूरमध्ये पोचण्यासाठी दीडशे रुपये खासगी वाहतुकीवर खर्च होतात. साधारण सार्वजनिक वाहतुकीवर मासिक सहा ते सात हजारांचा खर्च होतो.

वाहतूक व्यवस्था तातडीने सुरू करण्याची गरज

मुंबईमध्ये लोकलच्या माध्यमातून साठ ते ऐंशी किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी मासिक पासद्वारे साडेपाचशे रुपये खर्च होतात. याचाच अर्थ मुंबईच्या तुलनेत नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दहा ते बारापटींनी महाग असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तातडीने सुरू करण्याची नितांत गरज असल्याचे मत नाशिककरांमधून व्यक्त केले जात आहे. 

ही जबाबदारी महापालिकेची
नाशिककरांसाठी बससेवा अत्यंत महत्त्वाची आहे. एसटी महामंडळ बससेवा चालविण्यात असमर्थ असेल, तर महापालिकेने पुढाकार घेऊन तातडीने सेवा सुरू करणे गरजेचे आहे. विद्यार्थी, कामगार वर्गाची महागड्या खासगी प्रवासातून सुटका करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. - सुरेश पटेल, संचालक, नाशिक फर्स्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com