राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन 

विक्रांत मते
Monday, 28 September 2020

महापालिकेतील गुणवत्ता विभागासह बांधकाम विभागात रस्त्यांच्या डागडुजीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, महापालिका सत्ताधाऱ्यांना याबाबत विस्मरणाचा आजार जडला, असा आरोप करण्यात आला.

नाशिक : पावसाळ्यात शहरात जागोजागी खड्डे पडल्यानंतरही सत्ताधारी भाजपकडून खड्डे बुजविले जात नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने खड्ड्यांमध्ये दिवे लावून उपरोधिक आंदोलन केले. 

 नऊ हजार खड्डे बुजविण्याचा दावा

चार-पाच वर्षांपासून दर वर्षी रस्त्यांची कामे हाती घेतली जातात. पाच वर्षांत रस्त्यांवर तब्बल चारशे ते पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांना तीन वर्षांसाठी रस्ते दुरुस्तीचे दायित्व दिले. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्यात आली. परंतु खड्ड्यांमधील माती बाहेर आली. रस्त्यांवरचा थर बाजूला जाऊन खडी बाहेर आल्याचे दिसत आहे. प्रमुख रस्त्यांबरोबरच कॉलनीअंतर्गत रस्त्यांची स्थिती सारखीच आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असून, शारीरिक व्याधी जडत आहेत. तरीही महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने नऊ हजार खड्डे बुजविण्याचा दावा केला आहे. असे असताना रस्त्यांवर खड्डे जशाच्या तसे दिसत आहेत. काही रस्त्यांवरील खड्डे मुरूम व माती टाकून तात्पुरते बुजविल्याने पावसामुळे मुरूम, माती वाहून गेली आहे. त्यामुळे तात्पुरते बुजविलेले खड्डे परत दिसू लागले आहेत.

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

रस्त्यांच्या डागडुजीमध्ये भ्रष्टाचार

महापालिकेतील गुणवत्ता विभागासह बांधकाम विभागात रस्त्यांच्या डागडुजीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, महापालिका सत्ताधाऱ्यांना याबाबत विस्मरणाचा आजार जडला, असा आरोप करण्यात आला. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे खड्ड्यांमध्ये दिवे लावून व पूजा करून आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. कृष्णाजी काळे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, हर्षल चव्हाण, जय कोतवाल, सागर बेदरकर, मुकेश शेवाळे, नीलेश भंदुरे, राहुल कमानकर, अक्षय पाटील आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.  

 हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Youth Congress agitation by lighting lamps in potholes nashik marathi news