
नाशिक : खासगी ठेकेदारामार्फत सफाई कर्मचाऱ्यांना नियमित व पूर्ण वेतन मिळत नसल्याचा आरोप करीत समांतर चौकशी करणाऱ्या भाजप नगरसेवकांकडून सत्ताधारी भाजपला घरचा आहेर देण्यात आला आहे. समांतर चौकशी होत असेल, तर भाजपचा प्रशासनावर वचक नाही किंवा प्रशासनाकडून काम करून घेण्यात भाजप कमी पडत असल्याचा दावा पक्षातीलच नगरसेवकांकडून केला जात आहे.
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्या संदर्भात सुनील झंवर यांच्या रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर छापा टाकला. त्या वेळी जळगावमधील सफाई कर्मचाऱ्यांची एटीएम कार्ड व वॉटरग्रेस कंपनीशी संबंधित कागदपत्रे सापडली होती. त्या वेळी एटीएम कार्ड नाशिकमधील स्वच्छता कर्मचऱ्यांचे असल्याचा आरोप झाला होता. आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने चौकशीचे आदेश घनकचरा व्यवस्थापक डॉ. कल्पना कुटे यांना दिले. चौकशीचा अहवाल स्थायी समितीत सादर करण्यात आला. त्या वेळी वॉटरग्रेसला क्लिन चीट देताना, असा कुठलाच प्रकार झाला नसल्याचे पुराव्यानिशी सांगितले. स्थायी समितीने देखील प्रशासनाचा अहवाल मान्य केला. परंतु भाजपच्या काही नगरसेवकांना ही बाब मान्य नव्हती. स्थायी समितीत यासंदर्भात उच्चार न करता समांतर चौकशी करण्यात आली. भाजपचेच नगरसेवक कमलेश बोडके यांनी समांतर चौकशी केल्याचा दावा केला. २० ते २५ स्वच्छता कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांना पूर्ण वेतन मिळते की नाही, याबाबत माहिती घेताना ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांच्या वेतानात मोठी कपात होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ, मोबाईल रेकॉर्डिंग व कागदपत्रे आयुक्तांकडे सादर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांना दहा ते बारा दिवस काम देऊन अन्य दिवशी वेतन कपात करून सुट्ट्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला.
सत्ताधारी भाजपवरच अविश्वास
नगरसेवक बोडके यांनी एखाद्या विषयासंदर्भात सखोल संशोधन करणे गैर नाही. परंतु महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सत्तेच्या माध्यमातून प्रशासनावर वचक ठेवण्याचे काम सत्ताधारी म्हणून भाजपचे आहे. बोडके समांतर चौकशी करत असतील, तर प्रशासनावर भाजपचा वचक नाही. प्रशासन चुकीचे काम करत असेल महासभेत किंवा स्थायी समितीच्या सभेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करता येणे शक्य असल्याने तेथे विषय का मांडला जात नाही, बोडके यांनी केलेली चौकशी कायद्याच्या चौकटीत बसते का किंवा त्यांना घटनात्मक अधिकार आहे का, असे अनेक सवाल भाजपच्याच नगरसेवकांमधून व्यक्त होत आहे. दुसरीकडे महापौर निवडणुकीवेळी सानप समर्थक नगरसेवकांमध्ये बोडके यांचा समावेश होता. सानप भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले असले तरी त्यांच्या समर्थकांनी भाजपला मनोमन स्वीकारले नसल्याचे भाजपमध्ये बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.