सरपंचपदाच्या आरक्षणानंतर मिळविलेली सत्ता टिकविण्याचे आव्हान; फोडाफोडीच्या राजकारणाची पॅनलप्रमुखांना धास्ती!

एस.डी. आहिरे 
Friday, 22 January 2021

पिंपळगाव परिसरातील गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काळजाचा ठोका चुकविणारे होते. एक-एक जागा दोन अन्‌ तीन मतांनी पराभूत झाली. त्यामुळे सत्ता जाऊन प्रतिस्पर्धी गटाला बहुमत मिळाले. एका जागेवरून बहुमत गेल्याचा मनस्ताप सुरू असताना काठावरचे बहुमत मिळवून मोठ्या अथक परिश्रमाने मिळविलेली सत्ता टिकविण्याचे आव्हान पॅनलप्रमुखांसमोर आहे.

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पिंपळगाव परिसरातील गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काळजाचा ठोका चुकविणारे होते. एक-एक जागा दोन अन्‌ तीन मतांनी पराभूत झाली. त्यामुळे सत्ता जाऊन प्रतिस्पर्धी गटाला बहुमत मिळाले. एका जागेवरून बहुमत गेल्याचा मनस्ताप सुरू असताना काठावरचे बहुमत मिळवून मोठ्या अथक परिश्रमाने मिळविलेली सत्ता टिकविण्याचे आव्हान पॅनलप्रमुखांसमोर आहे. अर्धी लढाई जिंकल्यानंतर सरपंच निवडीवेळी सदस्य फुटू नये, यासाठी पॅनलप्रमुखांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खुल्या प्रवर्गामध्ये इच्छुक अन्‌ नाराजीचे प्रमाण अधिक राहणार आहे. त्यामुळे ऐनवेळी अनेक ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण व त्यातून घोडेबाजार जोर धरण्याची शक्यता अधिक आहे. 

दगाफटका होणार...!

पिंपळगाव परिसरातील शिरवाडे वणी, कारसूळ, अंतरवेली, वडाळीनजीक आदी गावांमध्ये एका जागेवरून बहुमत अन्‌ अल्पमत आहे. त्यातच सरपंचपदाचे आरक्षण निघेल त्या प्रवर्गाचा सदस्य अल्पमतातील गटाला असल्याने राजकीय जांगडगुता होणार आहे. सत्ता येऊन पराभव स्वीकारण्याची वेळ येऊन शकते. यापूर्वी आरक्षण अगोदर जाहीर होत असल्याने किमान ती जागा संपूर्ण शक्तीनिशी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जात होता. आता काठावर बहुमत असल्याने पॅनलप्रमुखांना आपल्या सदस्यांना सांभाळावे लागत आहे. अशा वेळी कोणताही दगाफटका होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यातही बहुतांश खुल्या प्रवर्गामध्ये इच्छुकांची संख्या अधिक, तिथेच धोका होण्याची भीती अधिक असते. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

एक-एक सदस्य अनमोल... 

काठावर सत्ता आलेल्या ठिकाणी पॅनलप्रमुखांची झोप उडाली आहे. इच्छुकाला डावलण्याची शक्यता दिसल्यास तो दुसऱ्या गटाला मिळण्याचा धोका आहे. एखाद्या सदस्याने बंडाळी केली तर सर्व खेळखंडोबा होणार आहे. त्यामुळे आरक्षणानंतर चित्र स्पष्ट होताच कुरघोडी व फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येईल. धोका नको म्हणून सदस्य अज्ञातस्थळी रवाना होतील. सध्या कोणते आरक्षण पडणार याचीच चर्चा गावागावांत रंगत आहे. 

पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना डच्चू... 

निफाड तालुक्यात बहुतांश ठिकाणी परिवर्तनाची लाट आली. नव्या चेहऱ्यांना मतदारांनी संधी दिल्याने पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना डच्चू मिळाला आहे. खुर्चीची हाव सुटत नसलेल्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे. दोनशेहून अधिक विद्यमान सदस्यांना मतदारांनी नाकारले. दरम्यान, पिंपळगाव बाजार समितीच्या संचालकांनाही आपल्या गावची सत्ता राखता आली नाही. संचालिका जयश्री पाटील यांची मुखेडमधील सत्ता गेलीच. शिवाय स्वत: पराभवाची नामुष्की टाळू शकल्या नाहीत. शिरवाडे वणीच्या संचालिका अश्‍विनी काळे यांच्या हातून एका जागेवरून सत्तेने हुलकावणी दिली. सोनगावला विजय कारे यांच्या पॅनलचा पराभव झाला. दात्याणे येथे संचालक निवृत्ती धनवटे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about gram panchayat election in nashik district marathi news