स्थायी सभापतिपदासाठी भाजप-शिवसेनेत थेट लढत; भाजपचा एक सदस्य घटणार, तर सेनेचा वाढणार

विक्रांत मते
Tuesday, 16 February 2021

तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य घटविण्याबरोबरच शिवसेनेचा एक सदस्य वाढविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.

नाशिक : तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य घटविण्याबरोबरच शिवसेनेचा एक सदस्य वाढविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर २४ फेब्रुवारीला सदस्य नियुक्तीसाठी विशेष महासभा होणार आहे. समितीवर भाजपचे आठ, तर शिवसेनेचा एक सदस्य वाढणार असल्याने सभापतिपदासाठी थेट लढत होणार आहे. 

२०१७ मधील निवडणुकीत भाजपचे ६६ सदस्य निवडून आल्याने स्थायी समितीवर तौलनिक संख्याबळानुसार १६ पैकी भाजपच्या नऊ सदस्यांची नियुक्ती झाली होती. मात्र, दोन सदस्य घटल्याने तौलनिक संख्याबळही घटले. मात्र, महापौर सतीश कुलकर्णी यांनी विभागीय आयुक्तांकडे झालेल्या गटनोंदणीच्या आधारे गेल्या वर्षी भाजपच्या नऊ सदस्यांची नियुक्ती केली होती. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी स्थायी सदस्य नियुक्तीला आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालात तौलनिक संख्याबळ लक्षात घेऊन सदस्य नियुक्तीच्या सूचना दिल्या होत्या. दोन वर्षे पूर्ण झालेले आठ सदस्य निवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी २४ फेब्रुवारीला विशेष महासभा होणार आहे. भाजपच्या एका सदस्याचा राजीनामा घेऊन त्या जागेवार शिवसेनेच्या ज्योती खोले यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. भाजपचे चार, शिवसेनेचे तीन, तर मनसेच्या एका सदस्याची नियुक्ती केली जाईल. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

सत्ता राखण्यासाठी कसरत 

स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीनंतर सभापती निवडीची प्रक्रिया होणार आहे. सभापती निवडणुकीसाठी नऊ सदस्यांची आवश्‍यकता आहे. तौलनिक संख्याबळानुसार भाजपचे आठ, शिवसेनेचे पाच, मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक असे विरोधकांचे आठ सदस्य राहणार असल्याने समसमान बलाबल असेल. त्यामुळे भाजपच्या हातून स्थायी समितीची सत्ता जाऊ नये, यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीत मोठ्या आर्थिक उलाढाली होण्याची शक्यता आहे. सदस्यांची पळवापळवी होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थायीच्या सदस्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. 

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Municipal corporation Nashik Marathi political news