यंदा रमजान ईदचा माहेरचा पाहुणचार मुकणार! स्वातंत्र्यपूर्व काळापासून परंपरा.. 

ramdan.jpg
ramdan.jpg

नाशिक / मालेगाव : शहरातील अन्सारी- मोमीन समाजातील महिला दर शुक्रवारी माहेरी जाण्याची परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. कोरोना संसर्गाने त्यालाही चाप लावला आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये, यासाठी 50 टक्के महिलांनी माहेरी जाणे बंद केले आहे. वाढती रुग्णसंख्या उर्वरित महिलांना बाधित करण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी बोध घेण्याची गरज आहे. मात्र, यामुळे शहरातील महिला माहेरचा रमजान ईदचा पाहुणचार व मुलांच्या कपड्यांना मुकण्याची शक्‍यता आहे. 

तू मयके मत जय्यो मेरी जान... 
शिक्षित विणकर अन्सारी समाजबांधव आपल्या पत्नींना "तू मयके मत जय्यो, मत जय्यो मेरी जान...', अशी साद घालत आहेत. शहरातील बहुसंख्य असलेल्या मोमीन समाजात रोटी-बेटी व्यवहार शहरातच केले जातात. यामागे आपल्या मुला-मुलींवर आपले लक्ष राहावे, त्यांना सुख-दुःखात मदत करता यावी, हा हेतू आहे. ब्रिटिशांच्या अन्याय, अत्याचाराने पीडित व त्रस्त होऊन विणकरबांधव मालेगावला आश्रयाला आले. आपले वारीस सुरक्षित व आपल्या डोळ्यांसमोर असावेत, या हेतूने शहरातच मुली व मुलाचा विवाह करण्याची सुरू झालेली प्रथा आजही कायम आहे. 

महिला माहेरचा रमजान ईदचा पाहुणचार, मुलांच्या कपड्यांना मुकणार 
येथील सासूरवाशीण महिला आठवडाभर पतीकडे राहिल्यानंतर दर शुक्रवारी माहेरी आई-वडिलांकडे जातात. सुटीच्या दिवशी बहीण भावंडांसोबत मौजमस्ती व सासरच्या सुख-दुःखाच्या घडामोडी कथन केल्यानंतर मुलगी पुन्हा रात्री सासरी जाते. जाताना सासरकडील पतीसह कुटुंबीयांना खास पक्वान तयार करून नेले जाते. त्यामुळे सासरची माणसे खूश होतील व मुलीला त्रास देणार नाही, ही भावना आहे. ही प्रथाही लॉकडाउनच्या काळात घातक ठरत असल्याने, त्यावर मर्यादा आली आहे. माहेरी मुलगी आल्यानंतर तिच्या आवडीच्या वस्तू बनवितानाच तिला हव्या असलेल्या वस्तू देऊन तिची पाठवणी होते.

कोरोनाने महिलांचा एक दिवसाचा आनंदही हिरावला

रमजान वर्षातील महत्त्वाचा सण असल्याने त्यापूर्वीचे किमान तीन शुक्रवार आई, वडील व भाऊ मुलींसह तिच्या मुलांना कपडे, चप्पल- बूट घेऊन देतात. या वेळी यंत्रमागाचा खडखडाट बंद असल्याने या वर्षातील हक्काच्या कपड्यांना महिला मुकणार आहेत. त्याची खंत अनेक महिलांच्या बोलण्यातून जाणवते. काहींना शुक्रवारी मोहेरी न गेल्याने बेचैन झाल्यासारखे वाटत आहे. कोरोनाने महिलांचा एक दिवसाचा आनंदही हिरावला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com