'पूरा जिस्म खोखला बनानेवाली रोजीरोटी'...नरकयातनाच झेलताय 'इथं' गल्ली-बोळातील लाखो जीव!

mosam river.jpg
mosam river.jpg

नाशिक : मालेगाव शहरात प्रवेश करताना महामार्गाच्या डाव्या बाजूचा "महाराष्ट्राचे मॅंचेस्टर मालेगाव नगरीत आपले स्वागत आहे' हा फलक अनेकांना सुखावून जातो. पुढच्या पाचच मिनिटांत पाहुणा जेव्हा मोसम पूल ओलांडतो, तेव्हा मात्र त्याचे स्वागत मोसम नदीतील दुर्गंधीने होते. इथेच मालेगाव महापालिकेची लक्तरे वेशीला टांगली जातात. ही दुर्गंधी केवळ वरवरची आहे. त्यापलीकडे, अख्खे शरीर पोखरून काढणाऱ्या रोजीरोटीच्या नरकयातना झेलणारे माणूस नावाचे लाखो जीव शहराच्या गाभाऱ्यातल्या गल्ली-मोहल्ल्यांमध्ये जगताहेत. 

दयनीय परिस्थिती; प्रशासन मात्र निर्धास्त 

वार्षिक तीन हजार कोटींच्या यंत्रमाग व्यवसायातल्या अडीच लाख दरिद्री कामगारांचे दु:ख यंत्रमागाच्या खडखडाटात विरून जाते. अधूनमधून चर्चा होते. पण, ती फक्‍त सहानुभूतीपोटी. सुधारणा होत नाहीत. मास्क, ग्लोव्हज, बूट, चष्मा, हेल्मेट, कपडे या साधनांविना लुंगी, बनियनवर काम करणारे लाखो कामगार प्रदूषणाच्या विळख्यात जखडले गेलेत. देशातून हद्दपार होत असलेला क्षयरोग मालेगावात जणू कायमस्वरूपी मुक्कामाला आहे. सायझिंग, यंत्रमाग, गिट्टी व पाइप कारखान्यांचे प्रदूषण कामगारांबरोबरच अख्ख्या शहराच्या मुळावर उठले आहे. यातून त्वचा, क्षयरोग, श्‍वसनाचे रुग्ण येथे मोठ्या संख्येने आहेत. विविध विभागांबरोबरच महापालिका याला सर्वाधिक जबाबदार आहे. शहरात सर्वत्र घाणीचे ढीग, तुंबलेल्या गटारी शहराच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे स्वतः पाटी-फावडे घेऊन घाण उचलायला लागतात तरीही महापालिकेच्या निर्धास्त प्रशासनाला फरक पडत नाही. शहराच्या मध्यातून वाहणारी मोसम नदी उकिरडा झाली आहे. 

रहिवासी क्षेत्रातही यंत्रमाग 

येथे दोन लाखांच्या आसपास यंत्रमाग आहेत. यातील 30 ते 40 हजार यंत्रमाग बंद आहेत. जवळपास अडीच लाख मजूर यावर काम करतात. महापालिका क्षेत्रात रहिवास व औद्योगिक अशा मिक्‍स झोनमध्ये यंत्रमाग आहेत. मालेगावात तशी तरतूद आहे. कच्च्या धाग्याचे पक्‍क्‍या धाग्यात सायझिंगमध्ये रूपांतर केले जाते. अशा सव्वाशे सायझिंग येथे आहेत. पक्‍क्‍या धाग्यापासून यंत्रमागावर सूत विणले जाते. एक कामगार अनेक लूम चालवितो. सायझिंग, यंत्रमागाबरोबरच बीम बनविणे, गाठ बनविणे, हमाल, वाहतूक असे सर्व घटक पाहता किमान तीन लाख मजुरांची रोजीरोटी या व्यवसायावर अवलंबून आहे. 

बारा तास काम अन्‌ आठवड्याला पगार 

कामगारांना बारा तास काम करावे लागते. औद्योगिक नियमांप्रमाणे सुरक्षाकवच नाही. बहुतांशी यंत्रमाग कारखान्यांत शौचालये नाहीत. प्रदूषणापासून रक्षण करणाऱ्या सुविधा नाहीत. यंत्रमागाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने अतिशय स्वस्तात मजूर उपलब्ध होतात. कामगारांना आठवड्याला पगार दिला जातो. बहुतांशी कामगार दोन ते चार हजार रुपये आठवड्याला कमवितात. 

टीबी, दम्याचे आजार 

यंत्रमागावर धागा विणताना बाहेर पडणारे तंतुमय पदार्थ, बारीक कण कामगारांच्या नाका-तोंडातून शरीरात जातात. परिणामी त्यांना जीवघेण्या व्याधींना सामोरे जावे लागते. मालेगाव चहाचे माहेरघर आहे. चहाबरोबर अनेकांना विडीचे व्यसन आहे. कमी दरात मिळणारी मालेगावची इस्माईल विडी हजारो जण ओढतात. औद्योगिक व आरोग्य सुविधांचा अभाव, विडीचे व्यसन यामुळे अनेक कामगारांना फुफ्फुस व टीबीचे आजार जडले आहेत. येथील क्षयरोग रुग्णालयात वर्षाला हजार रुग्णांवर उपचार होतो. योग्य उपचार होत नाहीत म्हणून अनेक जण औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात, तर शेकडो जण स्थानिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतात. अशा स्वरूपाच्या आजारामुळे प्रतिकारशक्ती कमी होत असून, कोरोनाचा धोका अशांना अधिक आहे. 

शेकडो महिला मजुरांचा मृत्यू? 

यंत्रमागाने हजारो महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पूर्वी चरख्यावर सूत विणले जायचे. ते प्रमाण आता कमी झाले आहे. यंत्रमागावरील फिरणाऱ्या तरासनमध्ये ओढणी अडकून गेल्या 50 वर्षांत शेकडो महिला मजुरांचा मृत्यू झाला असावा. अलीकडे हे प्रमाण कमी झाले असले तरी अधूनमधून अशा घटना घडत असतात. 

राज्य व केंद्र दोन्ही सरकारे जबाबदार 

मालेगावातील परिस्थितीला राज्य व केंद्र सरकारही तेवढेच जबाबदार आहे. भिवंडी, इचलकरंजी आदींसह अन्य भागापेक्षा येथील कापड उत्पादन खर्च जास्त आहे. मालेगावला प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे येथील कापड प्रक्रियेसाठी पाली, बालोत्रा आदी ठिकाणी पाठवावा लागतो. उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे कामगारांना सुविधा देण्यास कारखानदारांच्या मर्यादा येतात. यंत्रमाग उद्योगाबाबत केंद्राचे धोरण नेहमीच दुजाभावाचे राहिले आहे. अन्य उद्योगांप्रमाणे या उद्योगाला कर्जपुरवठा व अन्य सवलती मिळत नाहीत. शासनाची या उद्योगाबाबत मानसिकता बदलल्यास आधुनिकीकरणाबरोबरच कामगारांची सुविधा देणे शक्‍य होईल, असे व्यावसायिकांचे मत आहे. गेल्या 50 वर्षांत दुसरा एकही उद्योग मालेगावला आणण्यात आजवरच्या राजकीय नेतृत्वाला यश आलेले नाही. त्यामुळे गरज म्हणून आहे त्या परिस्थितीत कामगार यंत्रमाग व पाइप उद्योगात काम करीत आहेत. कामगारांना सुविधा देणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. 

आकडे बोलतात 

* यंत्रमागांची संख्या --- 2 लाख 
* सुरू असलेले --- 1 लाख 60 हजार 
* मजुरांची संख्या --- अडीच लाख 
* व्यवसायावर अवलंबून असलेले अन्य घटक --- 50 हजार 
* क्षयरोग, श्‍वसनाच्या आजाराचे प्रतिवर्ष रुग्ण --- अंदाजे 5 ते 7 हजार 
* प्रदूषणामुळे होणारे अन्य आजार --- रक्तदाब, त्वचा, दमा, मधुमेह, बहिरेपणा 

शहरातील कचऱ्याचे ढीग व तुंबलेल्या गटारींमुळे प्रदूषण वाढते. यातून नागरिकांना श्‍वसनासारखे व साथीचे आजार जडत आहेत. या संदर्भात आम्ही राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. लवादाने आदेश देऊनही महापालिका आयुक्तांनी त्याचे पालन केले नाही. आरोग्याच्या या दुर्दशेला पूर्णपणे महापालिका जबाबदार आहे. - कलीमभाई अब्दुल्ला याचिकाकर्ता, मालेगाव 

शहरातील सायझिंग, यंत्रमाग, गिट्टी कारखाने, पाइप कारखाने आदींपासून होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात आम्ही लढत आहोत. बाराही महिने साथीचे आजार असणारे मालेगाव हे एकमेव शहर आहे. याला महापालिकेसह शासनाचे विविध विभाग जबाबदार आहेत. 
-निखिल पवार सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com