दिलासादायक! जिल्ह्यात २४ दिवसानंतर कोरोना बाधितांचा आकडा १ हजाराच्‍या आत 

अरुण मलाणी
Tuesday, 29 September 2020

मंगळवारी आढळलेल्‍या नवीन कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५१४, नाशिक ग्रामीणचे १८५, मालेगावचे २९ तर जिल्‍हाबाह्य १७ रूग्‍णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ५१०, ग्रामीणचे ११५, मालेगावचे २४ तर जिल्‍हाबाह्य पाच रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक :  गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांचे प्रमाण घटले आहे. त्‍यातच मंगळवारी (ता.२९) तब्‍बल चोवीस दिवसांनंतर जिल्‍ह्‍यात एक हजाराहून कमी कोरोना बाधित आढळून आले. यापूर्वी गेल्‍या ५ सप्‍टेंबरला ९५१ बाधित आढळून आले होते. तर मंगळवारी दिवसभरात ७४५ बाधित आढळून आले. तर ६५४ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली. बारा रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, यातून सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या ७ हजार ६५० इतकी झाली आहे. 
सप्‍टेंबर महिन्‍याची सुरवात कोरोना आटोक्‍यात येण्याच्‍या अनुषंगाने दिलासादायक झाली होती.

ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णांमध्ये लक्षणीय घट

१ सप्‍टेंबरला ७८८, २ सप्‍टेंबरला ९७२, तर ५ सप्‍टेंबरला ९५१ असे पहिल्‍या आवठड्यात तीन दिवस नवीन आढळलेल्‍य कोरोना बाधितांची संख्या एक हजारांच्‍या आत राहिली. त्‍यातच बरे होणार्या रूग्‍णांचेही प्रमाण वाढल्‍याने सप्‍टेंबर सुरू होण्यापूर्वी उपचार घेत असलेल्‍या बाधितांची संख्या दहा हजारहून अधिक झालेली असतांना, या महिन्‍यात ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णांमध्ये लक्षणीय घट झालेली आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
 

६५ हजार ६३५ रूग्‍णांची कोरोनावर मात

दरम्‍यान मंगळवारी आढळलेल्‍या नवीन कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५१४, नाशिक ग्रामीणचे १८५, मालेगावचे २९ तर जिल्‍हाबाह्य १७ रूग्‍णांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ५१०, ग्रामीणचे ११५, मालेगावचे २४ तर जिल्‍हाबाह्य पाच रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. यातून जिल्‍ह्‍यातील कोरोना बाधितांचा आकडा ७४ हजार ६३३ झाला असून, यापैकी ६५ हजार ६३५ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्‍यान दिवसभरात आढळणार्या संशयितांचे प्रमाणही घटले आहे. नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ९१२, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १४७, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २३, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १२ तर जिल्‍हा रूग्‍णालयात १४ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत २ हजार २८२ अहवाल प्रलंबित होते. यापैकी तब्‍बल १ हजार ६४९ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

पाच दिवसांनंतर मालेगावला बळी 

दिवसभरातील बारा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणमध्ये तीन रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झालेला आहे. २४ सप्‍टेंबरला एका मृत्‍यूनंतर मालेगाव महापालिका हद्दीत गेल्‍या पाच दिवसांपासून कोरोनामुळे एकाही रूग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद नव्‍हती. परंतु मंगळवारी या परीसरात एका रूग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. जिल्‍ह्‍यात आतापर्यंत १ हजार ३४८ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona cases is less than 1000 nashik marathi news