प्रकोप वाढतोय.. जिल्ह्यात शंभरीच्या उंबरठ्यावर कोरोना बळींची संख्या 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असून, बळींची संख्याही आता शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. सोमवारी (ता. 8) जुने नाशिक भागातील नाईकवाडीपुरा येथील वृद्धाचा आणि शिरसगाव (ता. निफाड) येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 99 वर पोचली असून, निफाडमधील हा पहिलाच बळी आहे.

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असून, बळींची संख्याही आता शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. सोमवारी (ता. 8) जुने नाशिक भागातील नाईकवाडीपुरा येथील वृद्धाचा आणि शिरसगाव (ता. निफाड) येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या 99 वर पोचली असून, निफाडमधील हा पहिलाच बळी आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात 52 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यात नाशिकमध्ये 29, तर मालेगावातील 20 आणि उर्वरित रुग्ण जिल्ह्याच्या अन्य भागातील आहेत. 

नाशिक शहरात वृद्धाचा अन्‌ निफाड तालुक्‍यात पहिला बळी 
नाशिक शहरातील जेहान सर्कल परिसरातील रहिवासी असलेला 20 वर्षीय तरुण गेल्या 31 मेस स्पेनमधून आला होता. त्यास हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. रविवार पेठेतील लोणार गल्लीतील 14 वर्षीय मुलगा हा नवीन रुग्ण आहे, तर शिंगाडा तलाव परिसरातील 65 वर्षीय वृद्धाचाही अहवाल पॉझिटिव्ह आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तसेच द्वारका परिसरातील अमरधाम रोड भागातील सात जणांमध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. तर, सिडकोत एक महिला व तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.

दिवसभरातील 52 रुग्णांत 29 नाशिकचे, तर 20 मालेगावचे 

जुना नाशिक भागातील नाईकवाडीपुरा येथे आणखी एक 27 वर्षांची महिला, भद्रकालीतील खडकाळी येथे 43 वर्षीय महिला, आझाद चौकातील 65 वर्षीय महिला आणि अजमेरी मशीद येथील 69 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली. पंचवटीत मेरीतील 60 वर्षीय महिला आणि पेठ रोडवर आणखी दोघे, नाशिक रोडला सुभाष रोड परिसरातील 55 वर्षीय महिला व देवळाली कॅम्प परिसरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये बागवानपुरा येथील पाच वर्षांच्या मुलासह दोन महिला व एक पुरुष, बाजार मंझीलमध्ये दोन महिला आणि सिन्नर फाटा येथील 67 वर्षीय वृद्धा असे सात रुग्ण नाशिक शहरातील, तर तीन रुग्ण मालेगावमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यात, नाशिक शहरात 29 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा > भीतीदायक! दोघींना पकडून अंधारात खेचत नेले...भय इथले कधी संपणार?..

रुग्णसंख्या एक हजार 640 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पिंपळगाव बसवंतमध्ये एक व माडसांगवी येथे दोन नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, मालेगावमध्ये पुन्हा 17 कोरोनाबाधित आढळून आले. यात तीन व दहावर्षीय बालकांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार 640 झाली आहे. 448 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात 202 बाधित नाशिक शहरात उपचार घेत आहेत. 

हेही वाचा > वाहनांची वर्दळ कमी..तरीही जाताएत इतके जीव? दुष्टचक्र कधी संपणार?

आणखी दोघांचा मृत्यू 
शिरसगाव (ता. निफाड) येथील 55 वर्षीय पुरुषाच्या रूपाने सोमवारी तालुक्‍यातील पहिला बळी गेला. त्यांना गेल्या शुक्रवारी (ता. 5) जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर शनिवारी (ता. 6) त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, तसेच नाशिक शहरातील नाईकवाडीपुरा येथील 62 वर्षीय वृद्धाचा रविवारी (ता. 7) रात्री मृत्यू झाला. त्यांनाही गेल्या शुक्रवारीच दाखल करण्यात आले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona victims of a hundred in nashik district nashik marathi news