चिंताजनक! मालेगाव येतंय पूर्वपदावर...पण, नाशिकचं काय?...संख्या झाली तिप्पट

coronavirus nashik.jpg
coronavirus nashik.jpg
Updated on

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आता नाशिक शहरावर कोरोनाचा फास आवळताना दिसू लागले आहे. रविवारी (ता. 7) दिवसभरात आलेल्या 56 पॉझिटिव्ह रिपोर्टपैकी तब्बल 49 रुग्ण शहराच्या विविध भागांतील आहेत. त्यातच पंचवटी व अंबड लिंक रोडवरील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मालेगावमध्ये सध्या 76, तर नाशिक शहरात 234 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे नाशिकमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या मालेगावच्या तुलनेत तिप्पट आहे.

बाधितांची संख्याही दीड हजारापेक्षा अधिक
 

पंचवटीतील नागचौकात 85 वर्षांची वृद्धा व अंबड-लिंक रोडवरील 49 वर्षीय रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या सात दिवसांत शहरात कोरोनाचे 11 बळी गेले असून, शहरातील बळींची संख्या 20, तर जिल्ह्यात आतापर्यंत 97 बळी गेले आहेत. दिवसभरात विविध टप्प्यांमध्ये 56 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्याही दीड हजाराच्या पुढे गेली आहे. अंबड लिंक रोडवरील पाटील पार्क येथील मृत रुग्ण गेल्या 26 मेस दाखल झाला होता. रविवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवासी असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली होती, तर नागचौकातील वृद्ध महिलेस गेल्या आठवड्यात दाखल केल्यानंतर त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना शनिवारी (ता. 6) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

अमेरिकेतून परतलेला तरुण पॉझिटिव्ह 

नाशिक शहरात रविवारी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांपैकी भाभानगरमधील उत्कर्ष कॉलनीतील 22 वर्षीय तरुण 31 मेस अमेरिकेहून आल्यानंतर त्याला शहरातील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. तर, जुने नाशिक भागातील कोकणीपुरा, फुले मार्केट येथील 28 वर्षीय युवक, त्र्यंबक दरवाजा, दूध बाजार येथील 27 वर्षीय युवती, खतीब बंगलो, दारुसलाम कॉलनी येथील एकाच कुटुंबातील 25 आणि 27 वर्षीय युवक, टाकळी रोड परिसरातील चक्रधर सोसायटीतील एकाच कुटुंबातील 34 वर्षीय रुग्णासह आठवर्षीय मुलगी, 56 वर्षीय व 29 वर्षीय महिला असे चौघे, गोविंदनगरमधील जयश्री निवास येथील 39 वर्षीय रुग्ण आणि टाकळी रोडच्या काठे मळ्यातील 30 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यात रुग्णसंख्या दीड हजारावर 

दरम्यान, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक हजार 585 वर पोचली आहे. रविवारी इगतपुरीत बॉम्बे हॉटेलमागे राहणारे दोन युवक व एक महिला, नांदगावच्या संभाजीनगरमधील 28 वर्षीय तरुण, द्याने (मालेगाव) येथील 75 वर्षीय महिला आणि संगमेश्‍वरच्या पाटील वाड्यातील 40 वर्षीय महिला व 18 वर्षांच्या तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती 

कोरोनाबाधित : 1 हजार 585 
कोरोनामुळे मृत्यू : 97 
कोरोनामुक्त : 1 हजार 46 
सध्या उपचारार्थ दाखल बाधित : 393 
आतापर्यंत निगेटिव्ह रिपोर्ट : 11 हजार 616 
प्रलंबित रिपोर्ट : 314 

इगतपुरीतील चौघे एकाच कुटुंबातील
 
इगतपुरी शहर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, रविवारी (ता. 7) आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी (ता. 6) पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या नवाबाजार येथील 56 वर्षीय रुग्णाच्याच कुटुंबातील हे तिघे आहेत. त्यात 21 व 25 वर्षांचे युवक व 46 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या कुटुंबीयांच्या संपर्कातील लोकांचा प्रशासन शोध घेत असून, संबंधित परिसर सील केला आहे. तहसीलदार परमेश्‍वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक स्वरूपा देवरे, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी नवाबाजार परिसर सील करत, नागरिकांच्या तपासणीसाठी मोहीम राबविणार असल्याचे सांगितले. 

दोडीच्या रुग्णाचे मुंबई कनेक्‍शन 

दोडी : येथील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावातील चारही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. अरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांच्या स्वॅबचे नमुने घेतले असून, अनेकांची तपासणी करण्यात येत आहे. तीन दिवस गावातील सर्व किराणा दुकाने, दूध संकलन केंद्र, मेडिकलसह अत्यावश्‍यक सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित रुग्ण जनरल स्टोअर्सचा संचालक व येथील पतसंस्थेचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे त्यांचे मुंबईला जाणे-येणे व जनसंपर्कही जास्त असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सिडकोतील तरुण रुग्णवाहिकाचालक 

सिडको : जुन्या सिडकोतील भुजबळ फार्म परिसरातील 27 वर्षीय तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण महापालिकेच्या मोरवाडी रुग्णालयातील रुग्णवाहिकाचालक आहे. सिडको परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णांना ऍम्ब्युलन्समधून ने-आण केल्यामुळेच तो बाधित झाला असावा, असा अंदाज आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले डॉक्‍टर, नर्स व रुग्णांमध्येही भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात आम्ही योग्य ती काळजी घेत असल्याचे येथील वैद्यकीय अधीक्षक छाया साळुंखे यांनी सांगितले. दरम्यान, सिडको परिसरात आतापर्यंत 46 रुग्ण आढळले आहेत. बहुतांश रुग्ण पूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत. त्यांचा प्रतिबंधित क्षेत्रात संपर्क आल्याने ते बाधित झाले असावेत. 

दरम्यान, नाशिक महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित भागातील राहिवाशांसह शहरातील नागरिकांना कोरोनासदृश्‍य लक्षणे किंवा हृदयविकारांसह अन्य व्याधींचा त्रास जाणवत असल्यास, त्याबाबतची माहिती वैद्यकीय विभागास कळवावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास वेळीच मदत होऊन औषधोपचार करणे शक्‍य होईल. त्यामुळे नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com