धगधगते वास्तव...मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचली पण बॅंकांना सांगणार कोण?

uddhav thakrey.png
uddhav thakrey.png

नाशिक : कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाला सरकारने प्रतिहमी दिली असल्याने ज्यांची नावे यादीत आली आहेत, पण प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली नाही, अशांना थकबाकीदार समजू नये. अशा शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ही घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचलीही; परंतु बॅंका अजूनही त्यांना कर्जासाठी पात्र मानायला तयार नाहीत, असे धगधगते वास्तव "सकाळ'च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

92.5 टक्‍के शेतकरी पीककर्जापासून वंचित

नाशिक जिल्ह्यातील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळेल, असा शब्द मिळालेला नाही, तर 92.5 टक्‍के शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. परिणामी, मुख्यमंत्र्यांचा आदेश बॅंकांना कोण समजावून सांगणार, असा प्रश्‍न तयार झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बागायती, अवर्षण प्रवण क्षेत्र, अतिवृष्टी होणारा आदिवासी भाग असे विविध भूभाग आहेत. जिल्ह्यातील खातेदारांची संख्या सहा लाख 42 हजार 662 असून, त्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या साडेतीन लाखांहून अधिक आहे. जिल्ह्यातील एक हजार 960 पैकी एक हजार 577 खरीप गावे आहेत. द्राक्षे, कांदा, भाजीपाला, टोमॅटो, वायनरी, कृषिप्रक्रिया उद्योगांच्या पंढरीत यंदाच्या खरिपात करायचे तरी काय, असा यक्ष प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

असे केले सर्वेक्षण

या पार्श्‍वभूमीवर महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत "सकाळ'चे बातमीदार पोचले. प्रत्येक तालुक्‍यातील पाच शेतकऱ्यांकडून, मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीसह पीककर्जासंबंधी केलेली घोषणा माहिती आहे काय?, कर्जमुक्ती आणि पीककर्ज देण्याविषयीची मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची माहिती तुम्हाला गावातल्या कुणी दिली का?, खरीप पीककर्जासाठी बॅंक अथवा विकास सोसायटीकडे संपर्क केला का?, तेव्हा तुम्हाला खरिपासाठी पीककर्ज मिळेल असे सांगण्यात आले का? आणि तुम्हाला खरिपासाठी पीककर्ज मिळाले का? या पाच प्रश्‍नांची उत्तरे शेतकऱ्यांकडून घेण्यात आली. 

या सर्वेक्षणाचे ठळक निष्कर्ष 

मुख्यमंत्र्यांची घोषणा बहुतांश शेतकऱ्यांना माहिती आहे. घोषणा माहिती नसलेले शेतकरी कमी म्हणजे 21 टक्के आहेत. 45 टक्के शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची माहिती सांगण्याची तसदी गावातील राजकीय नेते, कार्यकर्ता, तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी-कर्मचारी, विकास सोसायटीचे संचालक-अध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे अधिकारी-संचालक यापैकी कुणीही घेतलेली नाही. खरिपाच्या पीककर्जासाठी बॅंक अथवा विकास सोसायटीकडे संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 68 टक्के आहे. संपर्क केलेल्या बॅंक शाखा आणि विकास सोसायटींमधून 37 टक्के शेतकऱ्यांना पीककर्जासाठी होकार मिळाला. यापैकी केवळ साडेसात टक्के शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पीककर्ज मिळाले आहे. 

साडेसात टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज 

नाशिक जिल्ह्याचे यंदाचे खरीप पीककर्जाचे उद्दिष्ट तीन हजार 303 कोटी रुपये आहे. पण या वाटपात महत्त्वाची भूमिका असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. कर्जमुक्तीचे एक हजार कोटी सरकारकडून कधी येतात, याकडे बॅंक डोळे लावून बसली आहे. परिणामी, राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून अधिकाधिक पीककर्ज वाटपाचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त असलेली सरकारी यंत्रणा आता खरिपाच्या तयारीसाठी लागली आहे. तरीदेखील, 4 जूनअखेर जिल्ह्यातील सात हजार 611 शेतकऱ्यांना 237 कोटी 94 लाख रुपये म्हणजेच, 7.20 टक्के पीककर्जाचे वाटप होऊ शकले आहे. 

सर्वेक्षणाच्या तालुकानिहाय ठळक नोंदी 

- बागलाण : कर्जमुक्ती आणि पीककर्जाची माहिती दोघांना राजकारण्यांकडून आणि एका शेतकऱ्याला कृषीतून मिळाली 
- त्र्यंबकेश्‍वर : एकाही शेतकऱ्याला पीककर्ज मिळालेले नसून एका शेतकऱ्याला वाचण्यातून पीककर्जाची माहिती मिळाली 
- नांदगाव : चार शेतकऱ्यांना विकास सोसायटीतून कर्जमुक्तीतून नवीन पीककर्जाची माहिती उपलब्ध झाली 
- सिन्नर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याला पीककर्ज मिळण्याचा दिलाय विश्‍वास 
- सुरगाणा : भात लागवडीच्या तयारीत व्यस्त झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत पीककर्जाची माहिती पोचली देखील नाही 
- निफाड : द्राक्षे-कांदा पंढरीतील दोन शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांची घोषणा माहिती नाही आणि त्याबद्दल सांगण्याची तसदी घेतली गेलेली नाही 
- इगतपुरी : कर्जमुक्तीच्या यादीत असूनही साऱ्या शेतकऱ्यांनी कर्जासाठी बॅंक अथवा सोसायटीकडे संपर्क केला नसल्याचे सांगितले 
- नाशिक : जिल्हा बॅंकेकडून कर्ज मिळत नाही म्हटल्यावर राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून पीककर्ज घेतल्याचे सांगणारे शेतकरी भेटलेत 

- मालेगाव : सर्वेक्षणात दोन शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांची घोषणा माहिती नसल्याचे आढळले आणि त्यांना त्याबद्दलची माहितीही दिली गेली नाही 
- येवला : बॅंक अथवा सोसायटीकडे संपर्क केल्यावर पीककर्ज मिळेल, असे शेतकऱ्यांना अद्याप सांगण्यात आले नाही. मंजुरीला पाठवल्याचे उत्तर शेतकऱ्यांनी ऐकले 
- पेठ : सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांची घोषणा माहिती; पण अद्याप कुणालाही पीककर्ज नाही मिळाले 
- कळवण : बॅंकेकडे निधी उपलब्ध झाल्यावर पीककर्ज मिळेल, असे उत्तर शेतकऱ्यांना मिळाले आहे 
- देवळा : पीककर्ज मिळेल, असे बॅंकेची शाखा आणि सोसायटीतून सांगितले गेले. पण पीककर्ज कुणालाही नाही मिळाले 
- चांदवड : कृषी सहाय्यक, राजकीय कार्यकर्ता, विकास सोसायटीचे संचालकांनी पीककर्जाबद्दलची माहिती दिली. पीककर्ज शेतकऱ्यांना मिळाले नाही 
- दिंडोरी : एका शेतकऱ्याला पीककर्ज मिळाले. इतर शेतकऱ्यांची चार प्रश्‍नांची उत्तरे होकारार्थी मिळालीत आणि पीककर्ज मिळण्याविषयीचे उत्तर नाही 

खरिपासाठी पीककर्ज वाटपाची स्थिती 

बॅंका पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पीककर्ज वाटप शेतकरी संख्या टक्केवारी 
राष्ट्रीयीकृत दोन हजार 243 कोटी 79 लाख 151 कोटी तीन लाख चार हजार 726 6.73 
ग्रामीण 16 कोटी 87 लाख 75 लाख 36 4.45 
खासगी 605 कोटी 74 लाख 55 कोटी 49 लाख एक हजार 393 9.16 
एनडीसीसी 437 कोटी 34 लाख 30 कोटी 67 लाख एक हजार 430 7.01 
एकूण तीन हजार 303 कोटी 74 लाख 237 कोटी 94 लाख सात हजार 611 7.20 
(जिल्हा बॅंक वगळता इतर बॅंकांची आकडेवारी मेअखेरची आहे.) 
(जिल्ह्यात गेल्यावर्षी तीन हजार 147 कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 58 टक्के पीककर्जाचे वाटप झाले होते.) 

एन. डी. सी. सी. बॅंकेच्या पीककर्ज वाटपाची माहिती 

- 2016-17 : एक हजार 574 कोटींचे उद्दिष्ट - एक हजार 719 कोटींचे वाटप (दोन लाख 40 हजार शेतकरी) 
- 2017-18 : दीड हजार कोटींचे उद्दिष्ट - 212 कोटींचे वाटप (15 हजार 794 शेतकरी) 
- 2018-19 : 500 कोटींचे उद्दिष्ट- 326 कोटींचे वाटप (24 हजार 767 शेतकरी) 
- 2019-20 : 480 कोटींचे उद्दिष्ट- 198 कोटींचे वाटप (12 हजार शेतकरी) 
(जून 2017 मध्ये कर्जमाफीची योजना जाहीर झाली आणि कर्जवसुलीच्या वेळेत नियमित परतफेड करणारे कर्जदारांनी परतफेड केली नाही. इथे बॅंकेची आर्थिक घडी विसकटली.) 
(आताच्या राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेतून एक लाख सहा हजार 979 खातेदारांना 979 कोटी 53 लाखांची कर्जमुक्ती मिळाली. त्यातील पाच कोटी जिल्हा बॅंकेला मिळाले.) 
(एक लाख 67 हजार 863 थकबाकीदारांकडून दोन हजार 91 कोटींचे येणे. त्यापैकी कर्जमुक्तीच्या 974 कोटींचा समावेश. 600 कोटींचे मोठे थकबाकीदार)  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com