
कोरोना काळात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातल्या त्यात आता साखर व डाळीसाळींच्या दरांनी काहीसा दिलासा दिला आहे.
एकलहरे (नाशिक) : कोरोना काळात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातल्या त्यात आता साखर व डाळीसाळींच्या दरांनी काहीसा दिलासा दिला आहे.
डाळींच्या दरात दोन वर्षांसारखी तेजी नाही
ऐन सणासुदीत तेल, तूप, हरभराडाळ, बेसन आदी वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यात तेलाच्या दरात आणखी वाढ झाली आहे. डाळ व साखरेच्या दरात मात्र काहीशी घसरण झाल्याने समाधानाचे वातावरण आहे. मूग, उडीदाचे पीक सप्टेंबरमध्ये, तुरीचे पीक डिसेंबरमध्ये, तर हरभरा व गहू मार्च-एप्रिलमध्ये येतात. यंदा मूग-उडीद व येणारे तुरीचे पीक उत्तम असल्याने डाळींच्या दरात दोन वर्षांसारखी तेजी राहणार नाही, अशी चिन्हे आहेत. मुगाचे पीक विदर्भ, मराठवाडा, राजस्थान, ओडिशामध्ये, तर तुरीचे पीक विदर्भात अमरावती, अकोला, मराठवाडा, तसेच सोलापूर, राजस्थान आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तूरडाळीची आयात ऑस्ट्रेलिया, टांझानिया व मूगडाळीची आयात बर्मा येथून केली जाते. यंदा डाळींचे उत्पादन चांगले असल्याने गतवर्षीच्या तुलनेत दरात पाच ते १५ रुपये किलोमागे कमी राहतील, असा अंदाज आहे.
हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका
डाळींचे क्विंटलचे घाऊक बाजारभाव असे
* तूरडाळ ९००० ते १००००
* मूगडाळ ९२०० ते ९७००
* हरभराडाळ ६३०० ते ६७००
* उडीद डाळ ९३०० ते १००००
* मठडाळ ९७०० ते ९९००
* मसूरडाळ ६६०० ते ६९००
हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!
यंदा मूग, तुरीचे पीक चांगले असून, गेल्या सीझनमध्ये १२५ ते १३० रुपये किलो तूरडाळ विकली गेली. डिसेंबर- जानेवारीत तिचे दर ८५ ते ९५ पर्यंत येणे अपेक्षित आहे. इतर डाळींचे दरही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा किलोमागे १५ ते २० रुपयांनी कमी आहेत. -विजय कोठारी, घाऊक व्यापारी