'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका 

राजेंद्र बच्छाव
Thursday, 26 November 2020

डोंगराच्या पूर्वेच्या बाजूने असलेल्या उतारावरून ते उतरत असताना मध्यावर गुळगुळीत दगड आणि वाळलेल्या गवतावरून ते घसरू लागले. खाली खोल दरी तर वर अवघड शिळामुळे खाली उतरणे आणि माघारी फिरणे अवघड झाल्याने त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत मदतीसाठी आवाज देणे सुरू केले. आणि मग....

इंदिरानगर (नाशिक) : डोंगराच्या पूर्वेच्या बाजूने असलेल्या उतारावरून ते उतरत असताना मध्यावर गुळगुळीत दगड आणि वाळलेल्या गवतावरून ते घसरू लागले. खाली खोल दरी तर वर अवघड शिळामुळे खाली उतरणे आणि माघारी फिरणे अवघड झाल्याने त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत मदतीसाठी आवाज देणे सुरू केले. आणि मग....

'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! 

दामोदरनगर येथील सुमित आणि आयुष तुळसकर हे दोघे भाऊ सिंहस्थनगर येथील त्यांचा मित्र समर्थ शिलाकसोबत बुधवारी (ता.२५) सकाळी नऊच्या सुमारास पांडवलेणी येथे गेले. तेथून पूर्वेच्या बाजूने असलेल्या उतारावरून उतरत असताना मध्यावर गुळगुळीत दगड आणि वाळलेल्या गवतावरून ते घसरू लागले. खाली खोल दरी तर वर अवघड शिळामुळे खाली उतरणे आणि माघारी फिरणे अवघड झाल्याने त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत मदतीसाठी आवाज देणे सुरू केले. मोबाईल रेंजची अडचण येत असल्याने त्यांचा कसाबसा मित्रांशी संपर्क साधला. डोंगरावर असलेल्या एकाने त्यांचा आवाज ऐकून पोलिसांना कळवले. त्यानंतर अग्निशमन दलाला तसेच वैनतेय संस्थेच्या भाऊसाहेब खानमहाले यांना कळल्यानंतर दुपारी साडेबाराला संस्थेचे किरण दाहिजे आणि रोहित हिवाळे दुपारी एकला डोंगरावर पोचले. 

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

मित्र हतबल असल्याने काहीच करू शकत नव्हता..

तिघांचा एक मित्र बसलेला दिसला. मात्र तो हतबल असल्याने काहीच करू शकत नव्हता. किरण आणि रोहित दोराच्या सहाय्याने खाली उतरले तर आकाश पवार, विकी मोरे, मानस लोहकरे, निनाद देसले, अपूर्व गायकवाड, सागर पाडेकर, हेमंत वाघ, राजेश वरखडे आणि वसुधा जाधव ही बॅकअप टीम वरून दोर नियंत्रित करत होती. दरम्यान, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे पथक तसेच खत प्रकल्पाच्या बाजूने असणाऱ्या रस्त्याने प्रशांत जाधव, राम सूर्यवंशी आणि दीपक घुगे हे ट्रेकर्सही मदतीसाठी पोचले. तब्बल सहा तास अडकून पडल्याने आणि भेदरलेल्यांना सर्वांनी शांत करून धीर देत दुपारी साडेतीनच्या सुमारास पोद्दार शाळेच्या बाजूकडे असणाऱ्या पायवाटेने खाली आणण्यात आले.

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद

विनाकारण पर्यटकांनी जीव धोक्यात घालू नये

पांडवलेणीच्या (त्रिरश्‍मी बौद्धलेणी) डोंगरावर पूर्वेकडील अवघड अशा जागेवर फिरण्यासाठी गेलेल्या आणि तब्बल सहा तास अडकून पडलेल्या दोघा भावंडांची आणि त्यांच्या मित्राची वैनतेय गिर्यारोहण संस्था, शीघ्र कृती दल, सिडको अग्निशमन दल आणि इंदिरानगर पोलिसांनी सुखरूप सुटका केली. पांडवलेणीला प्रवेश बंद असला तरी डोंगराच्या आसपास असणाऱ्या पायवाटेने जात विनाकारण पर्यटकांनी जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

प्रशिक्षण नसताना धाडस आणि हौसेखातर कधीही जिवावर बेतू शकते, हे सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे. सराव असेल आणि सोबत अनुभवी ट्रेकर्स असतील तरच अशा ठिकाणी गेले पाहिजे. - किरण दाहिजे आणि रोहित हिवाळे (वैनतेय संस्था, सदस्य)  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siblings Rescued at Pandavaleni released after six hours nashik marathi news