दुर्दैवी! विवाह सोहळ्यावर कोसळले दु:खाचे सावट; घटनेने गावात भयाण शांतता

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

लग्न घरात दुसऱ्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना. घटनेने घरच काय पण, संपूर्ण गावदेखील हादरले. विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले. गिरणा नदी डोहात कपडे धुवायला गेलेल्या त्या तिघींवर काळाचा घाला. त्यातील दोन बचावल्या अन् एक मात्र...

नाशिक : (मेहुणबारे) लग्न घरात दुसऱ्याच दिवशी घडली दुर्दैवी घटना. घटनेने घरच काय पण, संपूर्ण गावदेखील हादरले. विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले. गिरणा नदी डोहात कपडे धुवायला गेलेल्या त्या तिघींवर काळाचा घाला. त्यातील दोन बचावल्या अन् एक मात्र...

अशी  आहे घटना

बहाळ (ता. चाळीसगाव) येथे शनिवारी (ता. १०) सकाळी नऊच्या सुमारास या तिघी मुली डोहात कपडे धुवत होत्या. त्या वेळी त्यांना अंघोळ कराविशी वाटल्याने त्या पाण्यात उतरल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या वाहून गेल्या. हा प्रकार तेथून जात असलेल्या तरुणाच्या लक्षात येताच त्याने तातडीने डोहात उडी घेत दोघींना वाचवले. पण तिसरी मुलगी डोहाच्या पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाली. पूनम उखा खैरनार (वय १३) असे बेपत्ता मुलीचे नाव असून, ती मुळची पाचोरा येथील रहिवासी आहे़. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती पनवेल येथे मावशीकडे राहात होती. बहाळ येथे नातेवाइकांकडे लग्न असल्याने नुकतीच ती कुटुंबीयांसह आली होती. या लग्नासाठी भोकरबारी (ता. पारोळा) येथील तिच्या मावस बहिणी खुशी चंद्रकांत सौदागार (१३) व मनीषा चंद्रकांत सौदागर (११) दोघीही आल्या होत्या. घरापासून हाकेच्या अंतरावर गिरणा नदी असल्याने त्या शुक्रवारी (ता.९) या ठिकाणी अंघोळीला गेल्या होत्या. त्याचप्रमाणे शनिवारीही सकाळी नऊला त्या कपडे धुण्यासाठी नदीतील डोहाजवळ गेल्या. 

डोहात अंघोळ करण्याचा मोह बेतला जीवावर

अंघोळ करण्यासाठी म्हणून त्या डोहात उतरल्या. खोल डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने पूनम पाण्यात बुडू लागली, तर खुशी व मनीषाही पाण्यात ओढल्या जाऊ लागल्या. त्याचवेळी डोहाच्या बाजूने जात असलेल्या गणेश भोई या तरुणाच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने क्षणाचा विलंब न करता डोहात उडी घेऊन खुशी व मनीषा या दोघींना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत पूनम पाण्याच्या प्रवाहात हरवली. शोध घेऊनही ती सापडली नाही. दरम्यान, तीन मुली नदीत बुडाल्याची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. तसेच, मेहुणबारे पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने पूनमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारपर्यंत तिचा शोध लागला नव्हता. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

पहिल्या दिवशी आनंद, दुसऱ्या दिवशी शोक 

ज्या घरात लग्न होते, त्या घरात पहिल्या दिवसापर्यंत आनंदाचे वातावरण होते. मात्र, आज दुसऱ्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने विवाह सोहळ्यावर दु:खाचे सावट पसरले. मेहुणबारे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर उशिरापर्यंत पूनमचा शोध घेण्याचे काम सुरूच होते.  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One girl who were swept away in the Girna river is missing nashik marathi news