कांद्याचे लिलाव उद्यापासून होणार सुरु; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीनंतर व्यापाऱ्यांचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

शेतकरी आणि व्यापारी प्रतिनिधींची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. २८) नाशिकच्या दौऱयावर असताना घेतली. त्यामध्ये निर्यात खुली करणे, आयातीवर निर्बंध आणणे, साठवणुकीची मर्यादा वाढवणे या प्रश्‍नी केंद्रीय मंत्र्यांशी दोन दिवसांमध्ये शेतकरी आणि व्यापारी प्रतिनिधींसह पाठपुरावा करण्याचा शब्द पवार यांनी दिला होता.

नाशिक : कांद्याचे भाव वाढल्यानंतर निर्यातबंदी, व्यापाऱयांवर धाडी आणि साठवणुकीवर निर्बंध यामुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी सोमवारपासून (ता. २६) जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दिवसाला ४० कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. आज सायंकाळी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे, कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली. साठवणुकीची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे शुक्रवारपासून (ता. ३०) जिल्ह्यात कांद्याचे लिलाव सुरु करण्याची ग्वाही व्यापाऱ्यांनी दिली. 

शेतकरी आणि व्यापारी प्रतिनिधींची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. २८) नाशिकच्या दौऱयावर असताना घेतली. त्यामध्ये निर्यात खुली करणे, आयातीवर निर्बंध आणणे, साठवणुकीची मर्यादा वाढवणे या प्रश्‍नी केंद्रीय मंत्र्यांशी दोन दिवसांमध्ये शेतकरी आणि व्यापारी प्रतिनिधींसह पाठपुरावा करण्याचा शब्द पवार यांनी दिला होता. आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये कांदा व्यापाऱयांची बैठक होणार होती. पण मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याची माहिती मिळताच, शेतकरी आणि व्यापारी प्रतिनिधी मुंबईला रवाना झाले. मंत्रीमंडळाची बैठक संपल्यानंतर वर्षा निवासस्थानी बैठक झाली. कांद्याचे लिलाव बंद झाल्याने शेतकऱयांची आर्थिक अडचण झाल्याचे गाऱहाणे कांदा उत्पादक संघटनेतर्फे मांडण्यात आली. तसेच सात महिन्यांपासून व्यवहार न केलेल्या व्यापाऱयावर धाड टाकण्याचा संताप व्यापारी संघटनेतर्फे मांडण्यात आला. उत्पादन होणाऱया जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कांदा मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी येत असताना घाऊक व्यापाऱयांसाठी २५ टन साठवणुकीची मर्याद तोकडी असल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.  भुसे यांनीही साठवणूक मर्यादा कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

शेतकरी-कामगारांची होऊ नये अडचण 

शेतकरी आणि व्यापाऱयांची अडचण होऊ नये म्हणून केंद्र सरकारकडे कायमस्वरुपी प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी आणि कामगारांची सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर अडचण होऊ नये म्हणून लिलाव सुरु करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱयांना केली. त्यानंतर व्यापारी संघटनेतर्फे लिलाव सुरु करण्याचा शब्द देण्यात आला. दरम्यान, गेल्या चार दिवसांमध्ये १६० कोटींच्या कांद्याची उलाढाल होऊ शकली नाही. त्यामुळे चाळींमध्ये शिल्लक असलेला कांदा सडण्याच्या भीतीचा गोळा शेतकऱयांच्या पोटात उमटला होता. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, प्रवक्ते शैलेंद्र पाटील, कांदा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष नंदकुमार डागा, नितीन जैन, खंडू देवरे, संतोष अट्टल, संदीप लुंकड, गोटू राका, प्रवीण कदम आदी उपस्थित होते. 

राज्य सरकारने पणन मंडळातर्फे राज्यातील शेतकऱयांकडून थेट कांदा खरेदी करावा आणि विक्रीसाठी इतर राज्यात पाठवावा. तीनदा पेरणी केल्याने राज्य सरकारने कांदा बियाण्याची उपलब्धता करुन द्यावी. तसेच लॉकडाऊनमध्ये उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत विक्री झालेल्या कांद्यास नुकसान भरपाई म्हणून क्विंटलला ५०० रुपयांचे अनुदान राज्य सरकारने द्यावे. हे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी निवेदन कृषी सचिवांकडे सोपवले. 
- भारत दिघोळे (अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना) 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे यांनी साठवणूक निर्बंधाचा प्रश्‍न केंद्र सरकारपर्यंत नेण्याचा शब्द दिला आहे. तसेच सणासुदीच्या तोंडावर शेतकऱयांच्यादृष्टीने बाजार समित्यांमधील लिलाव सुरु करण्यास सांगितले आहे. सर्वांच्या सूचनेला मान देत शुक्रवारपासून (ता. ३०) नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलावात व्यापारी सहभागी होतील. 
- नंदकुमार डागा (उपाध्यक्ष, कांदा व्यापारी संघटना) 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

कांदा बियाणे निर्यातबंदी 

कांद्याची निर्यातबंदी झाली. त्यानंतर आज विदेश व्यापार संचालनालयातर्फे कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे आदेश महासंचालक अमीत यादव यांनी दिले आहेत. देशातंर्गत बियाण्यांचा तुटवडा जाणवतो. त्यामागे बियाण्याची होणारी निर्यात हे कारण असल्याची तक्रार होती. दक्षिणेतून चेन्नईहून श्रीलंकेला वर्षभरात दोन कंटेनरभर बियाण्यांची निर्यात होते. तसेच बांगलादेशमध्ये कांद्याचे दोन महिन्यांचे पीक असल्याने नाशिकहून कांदा बांगलादेशला ट्रकमधून विक्रीसाठी रवाना होतो. तसेच नाशिकहून कांद्याचे बियाणे बांगलादेशला विक्रीसाठी जाते. केंद्राच्या निर्यातबंदीमुळे आता बियाणे जाणे थांबणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion auction will start from tomorrow after the meeting in the presence of the Chief Minister nashik marathi news