रब्बीत सर्वाधिक आठ हेक्टरवर कांद्याचा जुगार! पेरणी ९९ टक्के पूर्ण

rabbi onion 1.jpg
rabbi onion 1.jpg

येवला (जि.नाशिक) : यंदा वरुणराजाने साथ दिल्याने तालुक्यात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रब्बीची विक्रमी क्षेत्रात पेरणी झाली आहे. यंदा रब्बीची ९९ टक्के पेरणी झाली असून, उत्तर-पूर्व भागात गव्हाचे पीक काढणीच्या टप्प्यात आहे. बाजारभाव टिकून असल्याने यंदा रब्बीत सर्वाधिक क्षेत्रावर रांगडा-उन्हाळ कांद्याची लागवड झाली असून, अद्यापही ती सुरूच आहे. 

रब्बीत सर्वाधिक आठ हेक्टरवर कांद्याचा जुगार!
तालुक्याची शेती आठमाही असून, सर्वत्र जोरदार पाऊस झाला तरच रब्बीचा हंगाम पिकतो. विशेषतः अवर्षणप्रवण असलेल्या उत्तर पूर्व भागाची शेती पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. याउलट पश्‍चिम भागात पालखेड डावा कालव्याचा आधार मिळत असल्याने उन्हाळी पिकेदेखील निघतात. तीन-चार वर्षे रब्बीच्या पिकांना अल्प पावसामुळे फटका बसला होता. मात्र, २०१९ मध्ये तब्बल ८०७ मिलिमीटर, तर चालू वर्षी ७८२ मिलिमीटर (१५४ टक्के) पाऊस पडल्याने दोन्ही वर्षांत तालुक्यात सर्वदूर रब्बी पीक फुलले आहे. पाणी उपलब्ध आहेच. बरोबरच यंदा पीक पॅटर्नही बदलला आहे. तालुक्यात रब्बीत गहू, हरभरा व ज्वारीचे पीक घेतले जायचे.

पेरणी ९९ टक्के पूर्ण, मका लागवडीत दुप्पट वाढ 

यंदा मात्र पूर्णतः विरोधाभास असून, गेल्या वर्षी २८८ हेक्टर ज्वारी होती, ती यंदा अवघी ८७ हेक्‍टरवर आली आहे. गव्हाचे सहा हजार ७०० हेक्टर क्षेत्र टिकून आहे, तर रब्बी मक्याचे सरासरी क्षेत्र ३७१ हेक्टर असून, ते ३० ते ५० हेक्‍टरपर्यंत पीक घेतले जायचे. हेच क्षेत्र यंदा तीनपटीने वाढून ८०५ हेक्टर झाले आहे, तर हरभऱ्याच्या क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत घट होऊन तीन हजार २०० हेक्टरवर हरभरा पीक घेतले आहे. 

कांद्याची लागवड सुरूच 
बदलत्या हवामान परिस्थितीमुळे यंदा कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश येथे ही मुबलक प्रमाणात कांदा पिकला आहे. निसर्गातील बदलामुळे कांद्यावर बुरशीचे विचित्रपणे आक्रमण झाल्याने लावलेला कांदा वाफ्यातच ५० ते ७० टक्के सडल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे सरासरी दोन हजारांचा भाव टिकून असून, शेतकरी समाधानी आहे. यापुढे हीच परिस्थिती राहू शकते. या अंदाजाने अन्‌ यंदा पाणी असल्याने सर्वच शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे तालुक्यात आठ हजार २३७ हेक्‍टरवर रब्बी व उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. पालखेडची दोन-तीन आवर्तने तसेच तुडुंब भरलेली शेततळीही शिल्लक असल्याने कांद्याचे पीक निघेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. याउलट उत्तर पूर्व भागातील काही शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्याने व या भागात पाण्याचे स्रोत नसल्याने शेकडो एकरावरील कांदा पीक मात्र पाणीटंचाईच्या फेऱ्यात अडकले आहे. 

रात्री कांदा लागवड 
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकरी रात्रीच्या वेळी हॅलोजनच्या उजेडात कांदा लागवड करतानाचे चित्र सध्या दिसत आहे. दिवसा मजूर मिळत नसल्याने रात्रीची कांदा लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. रात्री आठपासून ते बारापर्यंत कांदा लागवडीचे काम सुरू असते. 

अशी झाली पेरणी... 
पीक - सरासरी - पेरणी - टक्केवारी 
ज्वारी - ७४१ - ८७ - १२ 
गहू - ६०८७ - ६७७६ - १११ 
मका - ३७१ - ८०५ - २१६ 
हरभरा - ३७६७ - ३२०४ - ८६ 
एकूण - १०९६८ - १०८७२ - ९९.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com