वाहन परवान्यासाठी अर्जदारांना ऑनलाइन प्रशिक्षण; आरटीओ कार्यालयाचा निर्णय

अरुण मलाणी
Saturday, 28 November 2020

वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी जिल्ह्यातील अर्ज करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील अर्जदारांना मुंबई नाका परीसरातील चिल्‍ड्रन ट्राफिक एज्‍युकेशन पार्क येथे दोन तासांचे मोफत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ​

नाशिक : येथील प्रादेशिक परीवहन कार्यालयात वाहन चालविण्याच्‍या नवीन परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील अर्जदारांना आधी प्रशिक्षण बंधनकारक आहे. पण कोरोनामुळे प्रशिक्षण प्रक्रिया राबविणे शक्‍य नव्‍हते. यावर तोडगा काढत प्रशिक्षण देणाऱ्या नाशिक फर्स्ट संस्‍थेने या एक डिसेंबरपासून ऑनलाइन झुम ॲपद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पक्‍के परवाना देण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण केल्‍याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 

देशात होणाऱ्या अपघातांत मृत्‍यू होणाऱ्यात १८ ते २५ वयोगटातील युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचा नाशिक आरटीओ कार्यालयाचा दावा आहे. याच कारणातून वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी जिल्ह्यातील अर्ज करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील अर्जदारांना मुंबई नाका परीसरातील चिल्‍ड्रन ट्राफिक एज्‍युकेशन पार्क येथे दोन तासांचे मोफत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भावामुळे प्रशिक्षण देणे शक्‍य होत नव्‍हते. यावर तोडगा म्हणून १ डिसेंबरपासून पक्‍के परवान्यासाठी अर्ज करण्याऱ्यांना झूम द्वारे ऑनलाइन प्रशिक्षण घेणे पुन्‍हा बंधनकारक केले आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली
 

प्रशिक्षणात असे होता येईल सहभागी 

या प्रशिक्षणासाठी अर्जदार हे नाशिक फर्स्ट संस्‍थेच्‍या दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३१५९६६ अथवा www.nashikfirst.com या संकेतस्‍थळावर नोंदणी करू शकतील. प्रशिक्षणासाठी नोंदणी करतांना अर्जदारांना त्‍यांचे नाव, ई-मेल आयडी, व्‍हॉट्‌सॲप मोबाईल क्रमांक, लर्निंग लायसन्‍स क्रमांक आणि त्‍याचा वाहन संवर्ग आदी माहिती देणे आवश्‍यक  असेल. हे प्रशिक्षण दर आठवड्याच्‍या मंगळवार, गुरूवार आणि शनिवार असे तीन दिवस सकाळी अकरा ते दुपारी एक या दरम्‍यान घेतले जाईल. 

१८ ते २५ वयोगटातील अर्जदारांना लायसन्‍स मिळविण्यासाठी गेल्‍या २०१७ पासून प्रशिक्षण घेणे बंधनकारक केले होते. आजवर ३५ हजारांहून अधिक युवकांना प्रशिक्षण दिले असून, कोविड-१९ मुळे प्रशिक्षणात अडचण निर्माण झाली होती. या अडचणीवर मात करून नाशिक फर्‍स्‍ट संस्‍थेतर्फे आता ऑनलाइन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्‍ध केली आहे. 
- विनय अहिरे, (उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी) 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online training for vehicle license applicants Nashik marathi news