शाळांमध्ये अवघी ३० टक्के हजेरी! पुढील वर्षातच विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची पालकांची मानसिकता 

विक्रांत मते
Tuesday, 2 March 2021

कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने १३ दिवस शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी गेल्या दोन महिन्यांत शाळांमध्ये अवघी ३० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी राहिली

नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने १३ दिवस शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी गेल्या दोन महिन्यांत शाळांमध्ये अवघी ३० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी राहिली. पालकांची विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठविण्याची मानसिकता नसल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे १३ दिवसानंतर शाळा पूर्ववत झाल्या, तरी विद्यार्थ्यांची अल्प हजेरी राहील, ही बाब लक्षात घेऊन शिक्षण विभाग पुढील वर्षांपासूनचं शाळा सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केले होते. ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्गाचा जोर ओसरल्यानंतर व्यवहार पूर्ववत होऊ लागले. शाळा मात्र सुरू करताना स्थानिक पातळीवर प्रशासनाने निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. नाशिक शहरात ४ जानेवारीपासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. २७ जानेवारीपासून महापालिका क्षेत्रात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. शाळा सुरू झाल्याने पालकांना दिलासा मिळाला. मात्र, फेब्रुवारी महिन्यात पुन्हा रुूग्ण वाढू लागले. या पार्श्‍वभूमीवर २ मार्चपासून पुढील १३ दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला. १५ मार्चपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग पालकांच्या संमतीनुसार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

पहिली ते चौथी अल्प हजेरी 

महापालिका व खासगी शाळा मिळून इयत्ता पाचवी ते आठवीचे एक लाख १० हजार ७७३ विद्यार्थी, तर दोन हजार ६०२ शिक्षकांमार्फत शाळा सुरू करण्यात आल्या. एक दिवसाआड या पद्धतीने आठवड्यातून तीन दिवस प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले. विशेषत: गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांचे वर्ग झाले. शाळेत येण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना टेस्ट, पालकांची संमती तसेच मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. १ मार्चपर्यंत शाळांमधील विद्यार्थी उपस्थितीचा आढावा शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. त्यात उपस्थितीचे प्रमाण अवघे ३० टक्के असल्याची बाब आढळून आली. शाळा सुरू झाल्यानंतरही पालकांची विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची मानसिकता नसल्याचे समोर आले. विशेष करून पहिली ते चौथीच्या वर्गात अवघे १० टक्के विद्यार्थी उपस्थित राहिले. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात पूर्णपणे शाळा बंद करून त्याऐवजी नवीन शैक्षणिक वर्षात नव्या दमाने शाळा सुरू करण्याच्या तयारीत प्रशासन असल्याचे बोलले जात आहे. 

दृष्टिक्षेपात..
महापालिकेच्या शाळा : १०२ 
खासगी शाळा : ३०३ 
एकूण शाळा : ४०५ 

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 
महापालिका शाळा : १५,४७६ 
खासगी शाळांचे विद्यार्थी : ९५,२९७ 
एकूण : १, १०, ७७३ 

शिक्षकांची संख्या 
महापालिका : ४७५ 
खासगी शाळा : २,१२७ 
एकूण : २,६०२  

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 30 percent attendance in schools Nashik Marathi News