रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटचा साठा संपला; संशयितांची धावाधाव 

विक्रांत मते
Friday, 20 November 2020

एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात आढळला. त्यानंतर मेपर्यंत कोरोना नियंत्रणात होता. जूनपासून कोरोना संसर्ग वाढला. सप्टेंबरमध्ये उच्चांक गाठला. त्यापूर्वी पालिका प्रशासनाने सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या मदतीने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता.

नाशिक : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महापालिकेने रॅपिड ॲन्टिजेन किटद्वारे झटपट तपासणीसाठी सव्वा लाखाहून खरेदी करण्यात आलेल्या किट संपल्याने कोविड चाचणीसाठी फीव्हर क्लिनिकवर आलेल्या संशयित रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगितले जात असल्याने नागरिकांची धावाधाव तर होत आहेच, त्याशिवाय आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्थायी समितीने अतिरिक्त २५ हजार किट खरेदीला मान्यता देऊनही होत नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. 

तातडीने उपचार करता येतील हा हेतू

एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण नाशिक शहरात आढळला. त्यानंतर मेपर्यंत कोरोना नियंत्रणात होता. जूनपासून कोरोना संसर्ग वाढला. सप्टेंबरमध्ये उच्चांक गाठला. त्यापूर्वी पालिका प्रशासनाने सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या मदतीने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून इतर बाधित शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील हा हेतू त्यामागे होता.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

संशयितांची धावाधाव, स्वॅब टेस्टिंगचा आग्रह 

आयुक्तांच्या अधिकारात खरेदी करण्यात आलेल्या एक लाख, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील खरेदी अशा एक लाख ३२ हजार रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट खरेदी करण्यात आल्या. त्या किट संपल्यानंतर स्थायी समितीने पुन्हा २५ हजार रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदीला मान्यता दिली. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना संशयितांकडून शहरातील ४० फीव्हर क्लिनिकमध्ये टेस्टची मागणी करण्यात आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीचा सल्ला दिला जात आहे. सध्या अवघी दोनशे किट शिल्लक असून, त्यावरच काम भागविले जात आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

कंपनीकडून नकार 
यापूर्वी ज्या कंपनीकडून किट खरेदी करण्यात आल्या त्या कंपनीचे ३५ हजार किटचे बिल थकल्याने संबंधित कंपनीने नवीन किट पुरवठा करण्यास नकार दिल्याचे बोलले जात असून, त्यातून किटची समस्या उभी राहिली आहे; परंतु या साठमारीत नागरिकांचे हाल होत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: out of stock of rapid antigen test kits nashik marathi news