अंत्यसंस्कारासाठी सुध्दा वशिलेबाजी! अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांना प्रथम प्राधान्य; नागरिकांकडून आंदोलनाचा पवित्रा

विक्रांत मते
Thursday, 17 September 2020

कोरोना काळात प्रत्येक व्यक्ती तणावाखाली असताना महापालिकेकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनातील काही कर्मचारी या काळातही नागरिकांना वेठीस धरत आहे.

नाशिक : कोरोना काळात प्रत्येक व्यक्ती तणावाखाली असताना महापालिकेकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनातील काही कर्मचारी या काळातही नागरिकांना वेठीस धरत आहे. .

अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये वशिलेबाजी

पिंपळनेर (ता. दिंडोरी) येथील पिंगळे नावाच्या व्यक्तीचा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या रुग्णालयात मंगळवारी (ता. १५) मृत्यू झाला. अमरधाममध्ये मृतदेह प्रतीक्षेत असल्याने मृताचे पुतणे विकी पिंगळे यांनी बुधवारी सकाळी अमरधाममध्ये नावनोंदणी करत महापालिकेची प्रक्रिया पार पाडली. मात्र, ‘मविप्र’ रुग्णालयातून मृतदेह मिळण्यास विलंब झाला. दुपारी दोनला मृतदेह अमरधाममध्ये आल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याच्या नातेवाइकाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येणार आहे, तसा निरोप अधिकाऱ्याकडून आल्याने त्यानंतर तुमच्या नातेवाइकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होतील, असे सांगण्यात आले. दुपारी अमरधाममध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्यांच्या नातेवाइकाचा मृतदेह अंत्यसंस्कारसाठी येणार असल्याने प्रथम त्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर तुम्हाला, असे सांगण्यात आल्याने संतापलेल्या नागरिकांनी अमरधाममध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला

‘आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा’

अधिकाऱ्याचे नातेवाईक कधी येतील, याबाबत वेळ निश्चित नसल्याने यादरम्यान मृतदेहावर अंत्यसंस्काराची मागणी पिंगळे कुटुंबीयांनी केली. ‘आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा’, अशी धमकीही देण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे संतापलेल्या पिंगळे कुटुंबीयांनी नगरसेविका विमल पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा नरेश यांना अमरधाममध्ये पाठविले. नरेश यांना तोच अनुभव आला. त्यांनाही दाद मिळाली नाही. आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे अमरधाममधील वशिलेबाजी उघड झाली आहे.

 

अमरधाममध्ये बुधवारी घडलेल्या प्रकाराबाबत वस्तुस्थिती जाणून घेऊन कारवाई करू.-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

 

संपादन : रमेश चौधरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: partiality at Amardham funeral nashik marathi news