#CoronaFighters : "कर्तव्यासाठी रुग्णालयाची वेस देखील ओलांडलेली नाही"...लढ्यासाठी करताएत रात्रीचा दिवस!'.

dr. hitesh mahale.jpg
dr. hitesh mahale.jpg

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी "लॉकडाउन' करण्यात आल्यानंतर सर्वांचे बारकाईने लक्ष होते, ते मालेगाव शहराकडे... जनजागृतीचा अभाव आणि लोकांची गर्दी यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष नियोजन करण्यात आले. मात्र, मालेगाव शासकीय सामान्य रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी एकमेव फिजिशियन डॉ. हितेश महाले असून, 18 मार्चपासून त्यांनी रुग्णालयाची वेस ओलांडलेली नाही. आयसोलेशन वॉर्डमध्ये (कोरोना विषाणू आजार विलगीकरण कक्ष) दाखल होणाऱ्या संशयित रुग्णांचे स्वॅबचे नमुने घेण्यापासून ते संशयित रुग्णांची नित्याची तपासणी ते स्वत: करीत आहेत. 

एकमेव फिजिशियन असल्याने सर्व जबाबदारी त्यांच्यावरच

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्ण येऊ लागले. डॉ. महाले 18 मार्चपासून मालेगाव सामान्य रुग्णालयातच तळ ठोकून आहेत. आत्तापर्यंत 63 कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब त्यांनी स्वत: घेतले असून, ते तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयामार्फत पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. सामान्य रुग्णालयात 20 खाटांचे कोरोना विलगीकरण कक्षात सुविधा करण्यात आली आहे. आजमितीस या कक्षात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसला, तरी 17 संशयित रुग्ण आहेत. तसेच ते एकमेव फिजिशियन असल्याने सर्व जबाबदारी त्यांच्यावरच आहे. ऑनकॉल असलेले फिजिशियन डॉ. पुष्कर इंगळे यांनी त्यांच्या राहण्याची सोय तर केलीच, शिवाय त्यांच्याच घरून त्यांना दोन वेळचे नियमित जेवणही येत आहे. 

जनजागृतीच्या अभावामुळे त्रास 

मालेगाव शहर संवेदनशील तर आहेच. परंतु ते मुस्लिमबहुल असल्याने या ठिकाणी जनजागृतीचा मोठा अभाव आहे. त्यामुळे डॉ. महाले यांच्याकडून रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना आणि रुग्णालयात येणाऱ्यांना वारंवार कोरोना विषाणूचा धोका आणि सोशल डिस्टन्सिंग याबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच मनुष्यबळाच्या कमतरतेसह सोयी-सुविधांचाही अभाव असल्याने एकाच वेळी कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

घरच्यांशी फक्त संवाद
 
डॉ. महाले यांच्या पत्नीही डॉक्‍टर असून, त्या चांदवडला प्रॅक्‍टिस करतात. चांदवडमध्ये त्यांचे कुटुंब राहते. घरात आठवीत शिकणारा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. 22 दिवसांपासून डॉ. महाले त्यांच्या घरी गेलेले नाहीत. सतत कोरोना संशयित रुग्णांच्या संपर्कात असल्याने त्याचा धोका कुटुंबीयांना नको, याचमुळे ते कदाचित जात नसावेत; परंतु कोरोनाविरोधातील लढा यशस्वी करण्याचा त्यांचा हेतू दृढ आहे. त्यामुळे वेळ मिळेल तसा ते त्यांच्या मुलांशी, कुटुंबीयांशी मोबाईलवरून संवाद साधतात. 

कोरोना विषाणूविरोधातील लढा महत्त्वाचा आहे. त्यासाठी आणखी चार महिनेही येथेच थांबण्याची तयारी आहे. आयसोलेशन वॉर्ड असल्याने ती जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे, त्यावर मात करण्याची गरज आहे. - डॉ. हितेश महाले, फिजिशियन, शासकीय सामान्य रुग्णालय, मालेगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com