"कोरोना व्हायरस''चा ऑनलाइन जगतातही संसर्ग...सावध व्हा!...कारण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

एकीकडे जगभर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे ऑनलाइन लूट करणाऱ्यांकडून नाना शकला लढविल्या जात आहेत. कर्जाचे हप्ते कमी करण्यासाठी, जनधन योजनेत पैसे जमा करण्यासह या ना त्या कारणाने संपर्क साधून बॅंकेची गोपनीय माहिती घेत ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता, बॅंकेची वा आर्थिक व्यवहाराची कोणतीही गोपनीय माहिती न देण्याचे आवाहन नाशिक सायबर पोलिसांनी केले आहे. 

नाशिक : एकीकडे जगभर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे ऑनलाइन लूट करणाऱ्यांकडून नाना शकला लढविल्या जात आहेत. कर्जाचे हप्ते कमी करण्यासाठी, जनधन योजनेत पैसे जमा करण्यासह या ना त्या कारणाने संपर्क साधून बॅंकेची गोपनीय माहिती घेत ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता, बॅंकेची वा आर्थिक व्यवहाराची कोणतीही गोपनीय माहिती न देण्याचे आवाहन नाशिक सायबर पोलिसांनी केले आहे. 

फेक कॉल, फेक मेसेजस धुमाकूळ

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन करण्यात आलेले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षमतेसाठी व्याजदरात कपात आणि कर्जाच्या हप्त्यांमध्ये सवलत देण्यात आलेली आहे, तसेच पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातूनही नागरिकांच्या बॅंक खात्यावर पैसे जमा होत आहेत. हीच आयती संधी साधून ऑनलाइन गंडा घालणारे संशयित जागे झाले असून, फेक कॉल, फेक मेसेजस करणे सुरू केले आहे. यातून नागरिकांनी फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. 

काय दाखविले जाते आमिष 

-प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना 2020 मध्ये नोंदणी करून महिन्याला 3,500 रुपये. 
-"फ्री नेटफिक्‍स' 20 लोकांनी किंवा पाच ग्रुपवर पाठविल्यास फ्री नेटफिक्‍स. 
-काही मोबाईल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांकडून फ्री रिचार्ज. 
-ईएमआयची तारीख वाढवून दिली जाईल तरी आपल्या मोबाईलवर आलेला "ओटीपी शेअर करा'. 
- ऑनलाइन संशयितांकडून "50 जीबी डेटा व 300 जीबी क्‍लाउड स्पेस मोफत'. 
-प्लस 90 या कोडने सुरू होणाऱ्या मोबाईलवरून फोन करून आर्थिक मदतीचे आवाहन. 

नवीन कोरोना व्हायरस मॅप मालवेअरपासून सावधान 

ऑनलाइन भामट्यांनी कोरोना व्हायरसच्या नावाने एक लिंक तयार केली आहे. ही लिंक ते मोबाईल व ई-मेलवर फॉरवर्ड करीत आहेत. या लिंकवर क्‍लिक केल्यास जगभरात कोरोना व्हायरसचा मॅप दिसेल असे या संदेशात म्हटले आहे. प्रत्यक्षात यावर क्‍लिक केल्यास मोबाईल वा संगणक हॅक होण्याची शक्‍यता आहे. याद्वारे ऑनलाइन भामटे बॅंकेची गोपनीय माहितीही चोरून त्याद्वारे आर्थिक गंडा घालण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे, any desk, quick support android, team viewer असे स्क्रीन शेअरिंग ऍप्स डाउनलोड करण्यासंदर्भात आमिष दाखवून गंडा घातला जाऊ शकतो. 

VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह? 

नागरिकांनी अशा कोणत्याही लिंकला क्‍लिक वा स्क्रीन शेअरिंग ऍप डाउनलोड न करता ते डिलिट करावे. थेट बॅंकेशी संपर्क साधून माहिती घ्यावी. कोणतीही गोपनीय माहिती बॅंकेकडून विचारली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. - पौर्णिमा चौघुले-श्रींगी, उपायुक्त, नाशिक सायबर क्राइम सेल  

हेही वाचा > होम क्वारंटाइन "आमदार' काही ऐकेना! केला "असा' कारनामा अन् पडले वादाच्या भोवऱ्यात!

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take precautions; The fake link challenges cyber-police nashik marathi news