पिंपळगावला कांदा, टोमॅटोची तेराशे कोटींची उलाढाल; बाजार समितीला १३ कोटींचे उत्पन्न

onion and tomato
onion and tomato

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला, की दरवाढ होते, हे सूत्र पिंपळगाव बाजार समितीतील दोन वर्षांत शेतमालाची आवक व बाजारभावावर नजर टाकल्यानंतर स्पष्ट होते. ओल्या दुष्काळाने यंदा कांदा व टोमॅटोची आवक घटली. त्याचा परिणाम बाजारभावात गतवर्षाची तेजी टिकून राहिली. त्यामुळे कोरोनाच्या काळात अवघ्या सात महिन्यांत कांदा, टोमॅटोतून तब्बल तेराशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहेत. यातून सुमारे १३ कोटींचे उत्पन्न बाजार समितीला मिळाले आहे. 

कांद्याची उलाढाल दीडपट

उन्हाळ कांद्याचा अभूतपूर्व तुटवडा व लाल कांद्याचे आगमन लांबल्याने यंदा दर नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत झेपावले. एप्रिल ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत गतवर्षापेक्षा यंदा कांद्याची आवक कमी होऊन ४७ लाख ७५ हजार क्विंटल एवढी झाली. आवकेत फारशी घट नसली तरी देशभरात कांद्याचे उत्पादन घटले. त्यामुळे बाजारभावात रोज पाचशे ते हजार रुपयांनी वाढ होत राहिली. तीन महिन्यांपासून पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पातळीच्या खाली दर आले नव्हते. त्यामुळे कांद्याची उलाढाल गतवर्षाच्या तुलनेत दीडपट झाली. ६०९ कोटी १७ लाखांची कांदा खरेदी-विक्रीतून उलाढाल झाली. 

५८६ कोटी ८५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या पदरात

उन्हाळ कांद्याने बाजारभाव व उलाढालीने उंच झेप घेतली असताना टोमॅटोनेही लाल क्रांती केली आहे. नोव्हेंबर २०२० अखेर एक कोटी ३० लाख क्रेट टोमॅटो पिंपळगाव बाजार समितीत विक्रीसाठी आले. धुव्वाधार पावसाने टोमॅटो उत्पादनावर मोठा परिणाम झाला. यात उशिरा का होईना दुबई, कतार, बांगलादेशला निर्यात झाली. त्यामुळे बाजारभाव प्रतिक्रेट ५०० रुपयांच्या पुढे स्थिर राहिले. बाजारभावाला लाली चढल्याने गतवर्षापेक्षा अधिक ५८६ कोटी ८५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या पदरात या बेभरवशाच्या टोमॅटोने दिले. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना टोमॅटोने यंदा चांगलाच आधार दिला आहे. त्यातून पिंपळगाव बाजार समितीला पाच कोटी ८६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

कांदा, टोमॅटोची आवक व किंमत 

कांदा : 

कालावधी आवक किंमत 

एप्रिल ते नोव्हेंबर २०२० ४७ लाख ७५ हजार ३४३ क्विंटल ६०९ कोटी १७ लाख ६५ हजार ७८४ रुपये बाजार समितीचे उत्पन्न : ६ कोटी ९१ लाख ७ हजार ६५८ रुपये 

टोमॅटो 

कालावधी आवक किंमत 

एप्रिल ते नोव्हेबंर २०२० १ कोटी ३० लाख ४१ हजार ३१० क्रेट ५८६ कोटी ८५ लाख ८९ हजार ५०० रूपये बाजार समितीचे उत्त्पन्न : ५ कोटी ८६ लाख ८५ हजार ८९५ रूपये 

कोरोना कालावधीतही पिंपळगांव बाजार समितीत सुरळीत लिलाव सुरू होते. पिंपळगाव बाजार समितीत सात महिन्यांची आकडेवारी पाहिली तर शेतकऱ्यांचा अटळ विश्‍वास आहे. काबाडकष्ट करून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांदा, टोमॅटोला चांगला दर मिळाल्याचे समाधान आहे. 
-आमदार दिलीप बनकर 


सकाळी लिलाव, वजन दुपारी व सायंकाळी शेतकरी पैसे घेऊन घरी. ही पिंपळगाव बाजार समितीच्या कामकाजाची पद्धत भावते. त्यामुळे कांदा, टोमॅटो विक्रीसाठी पिंपळगावला पहिली पसंती देतो. 
-सुभाष कदम (शेतकरी) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com