अंबड पोलीस ठाण्यातील आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

प्रमोद दंडगव्हाळ
Monday, 31 August 2020

"जगा आणि जगू द्या" असे नेहमी म्हणणारे अंबड पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात कार्यरत असणारे विजय रामकृष्ण शिंपी (५१ ) यांचे करोनाशी लढा देत असताना निधन झाले.

नाशिक/सिडको : "जगा आणि जगू द्या" असे नेहमी म्हणणारे अंबड पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात कार्यरत असणारे विजय रामकृष्ण शिंपी (५१ ) यांचे कोरोनाशी लढा देतांना निधन झाले. कोरोनामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊन काळात कायम पोलीस ठाण्यात हजर राहून कर्तव्य बजविण्याचे काम शिंपी यांनी केले होते. दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात यापूर्वी एक पोलिस अधिकारी कोरोनाचा बळी ठरले आहेत.

मनमिळावू आणि स्पष्टवक्ता अधिकारी 

या काळात विविध उपक्रम राबविण्याबरोबरच काही दिवसांपूर्वी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करून गणेशोत्सवाबाबतच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. अत्यंत मनमिळावू आणि स्पष्टवक्ता म्हणून शिंपी यांची पोलीस दलात ओळख होती. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी त्रास वाटू लागल्याने त्यांनी तपासणी केली होती. तर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना पंचवटी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, मुलगा, मुलगी व जावई असा परिवार आहे.

उद्घाटन सोहळा रद्द

सर्वांशी चांगला परिचय असलेले विजय शिंपी यांच्या निधनाची वार्ता आल्याने मंगळवारी सायंकाळी चार वाजता खुटवड नगर येथील पोलीस चौकीचे होणारा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. उद्घाटनासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे येणार होते.

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officer vijay shimpi passed away after corona infection nashik marathi news