biodisel 1.jpg
biodisel 1.jpg

बायोडिझेल भेसळीचा काळा बाजार! मालेगावमध्ये गुदामावर छापा; 'इतका' ऐवज जप्त

नाशिक / मालेगाव : शहरातील जाफरनगर भागातील एमबी सायजिंगनजीकच्या गुदामावर शुक्रवारी (ता. २१) दुपारी अपर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व महसूल विभागाने संयुक्तरीत्या छापा टाकून सुमारे तीन लाख १६ हजार ८०० रुपये किमतीचे पाच हजार ७६० लिटर बायोडिझेल, सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा ट्रक असा जवळपास सहा लाख ६६ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

‘सकाळ’च्या दणक्यानंतर झालेली कारवाई लक्षवेधी

राज्यातील बायोडिझेल भेसळीच्या गोरखधंद्याबाबत ‘सकाळ’ने आवाज उठविताच राज्यातील पंपांनी गाशा गुंडाळला. मात्र, त्यानंतर आता गुदाम व औद्योगिक क्षेत्राच्या नावाने किरकोळ विक्रीतून बायोडिझेल भेसळीचा काळा बाजार सुरू झाला आहे. ‘सकाळ’च्या दणक्यानंतर झालेली कारवाई लक्षवेधी असून, पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनने या कारवाईचे स्वागत केले आहे. 

पावणेसात लाखांचा ऐवज जप्त

शहरातील जाफरनगर भागात मोहंमद असद हाफिज अकील अहमद (रा. सरदारनगर) हा त्याच्या गुदामातून बायोडिझेलच्या नावाखाली कंपनी जनरेटर बायोडिझेल विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुख आरती सिंह, श्री. घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते, तहसीलदार चंद्रजित राजपूत, परिवीक्षाधीन नायब तहसीलदार विकास पवार, पथकातील पोलिस शिपाई दिनेश शेरावते, तुषार अहिरे, अभिजित साबळे आदींनी या गुदामावर छापा टाकला असता गुदामात ट्रक (एमएच १५, डीके ६६६०)मधून नळी टाकून बायोडिझेल खाली होत असल्याचे दिसून आले. बायोडिझेल विक्रीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता मोहंमद असद यांना माहिती देता आली नाही. त्यानंतर पोलिसांनी गुदाम व ट्रकची पाहणी केल्यानंतर पाच हजार ७६० लिटर बायोडिझेल व ट्रक असा पावणेसात लाखांचा ऐवज जप्त केला. 

ग्रामीण भागातही बायोडिझेलची विनापरवाना सर्रास विक्री
पोलिसांनी महसूल विभागाच्या मदतीने गुदामाला सील ठोकले आहे. रात्री उशिरापर्यंत पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू हाेती. बायोडिझेलच्या विक्री व साठवणुकीसाठी संबंधित मालकाने पुरवठा विभागाची परवानगीही घेतलेली नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे व या संदर्भातील अहवाल तातडीने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी ‘सकाळ’ला सांगितले. याच न्यायाने विनापरवाना बिनबोभाटपणे राज्यातील बायोडिझेल पंप सुरू हाेते. मात्र त्यांच्यावर कारवाईस विलंब झाल्याने शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातही बायोडिझेलची विनापरवाना सर्रास विक्री सुरू आहे. 

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

गुदामात मोठ्या ड्रमचा वापर 
‘सकाळ’च्या दणक्यानंतर बायोडिझेल पंपांकडे यंत्रणांची वक्रदृष्टी जाताच उपलब्ध साठा विक्रीसाठी विविध युक्त्या वापरण्यात येत आहेत. पोलिसांनी छापा टाकलेल्या गुदामात ८०० लिटरचे सात ड्रम आढळले. ट्रकमध्ये याच आकाराचे चार ड्रम मिळून आले. यातील दीड ड्रम भरलेला होता. उर्वरित ड्रम रिकामे झाले होते. दोनशे लिटरचे १६ रिकामे ड्रमही गुदामात मिळून आले. दहा पूर्ण भरलेल्या ड्रमसह प्रत्येकी दहा लिटरच्या ९६ कॅन येथे आढळल्या. पोलिसांनी प्रारंभी चौकशी केल्यानंतर औद्योगिक वापरासाठी बायोडिझेल देत असल्याचे सांगून संशयिताने वेळू मारून नेण्याचा प्रयत्न केला. परवाना, चलन याबाबत विचारणा केल्यावर त्याची भंबेरी उडाली. ट्रकवर ‘पवन ट्रान्स्पोर्ट’ असा उल्लेख आहे. ‘सकाळ’ने शुक्रवारच्या वृत्तात बायोडिझेलची पाळेमुळे खोलवर असल्याची शक्यता वर्तविली होती. ती गुदामातील बायोडिझेल साठ्यानंतर खरी ठरली.

(संपादन : ब्रिजकुमार परिहार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com