मंदिर उघडल्यानंतर राजकीय चढाओढ! भाविकांत चैतन्य, कार्यकर्त्यांत चुरस 

कमलाकर अकोलकर
Thursday, 19 November 2020

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे दरवाजे सोमवारी पहाटे पाचला उघडले. विशेष पूजेसह भाविकांना साडेपाचपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरे उघडल्याने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले असून, रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने चैतन्याचे वातावरण होते.

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर मंदिराचे दरवाजे सोमवारी पहाटे पाचला उघडले. विशेष पूजेसह भाविकांना साडेपाचपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरे उघडल्याने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले असून, रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने चैतन्याचे वातावरण होते. उत्तर दरवाजात स्थानिक भाविकांनी जय भोलेचा जयघोष करीत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. 

श्रेयवादाची चढाओढ! भाविकांत चैतन्य, कार्यकर्त्यांत चुरस  
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंदिरासमोर फलक लावून प्रथम मनसेतर्फे मंदिर उघडण्यास प्रयत्न करण्यात आल्याने बुधवारी मंदिरांचे दरवाजे खुले झाले, तर शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभाराचे बॅनर लावून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला. भारतीय जनता पक्षातर्फे दहाला उत्तर दरवाजासमोर आरती करून फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. जिल्हा कार्यकारिणीचे श्रीकांत गायधनी, तालुकाध्यक्ष विष्णू दोबारा, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, सचिन शुक्ल, भालेराव, विजय शिखरे यांच्यासह कार्यकारी सदस्य उपस्थित होते. एकंदरीत दीर्घ कालावधीसाठी मंदिरे बंद होती. ती उघडण्यासाठी ज्या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. त्या सगळ्यांची श्रेयवादावरून चढाओढ पाहायला मिळाली. 

 हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

पाडव्याच्या मुहूर्तावर तीन हजार भाविकांकडून शांततेत दर्शन
स्थानिकांना उत्तर दरवाजातून ओळखपत्र वा आधारकार्ड दाखवून प्रवेश दिला जात होता. बाहेरील भाविकांना पूर्व दरवाजातून प्रवेश होता. प्रवेशद्वारात सॅनिटायझर व ऑक्सिमीटरची व्यवस्था केली असून, ती सध्या कायम असणार आहे. मंदिरात भाविकांना फक्त दर्शन करून गायत्री दरवाजातून बाहेर जाण्यासाठी व्यवस्था केली असल्याने गर्दी अथवा गोंगाट नव्हता. पाडव्याच्या मुहूर्तावर तीन हजार भाविकांनी शांततेत दर्शन घेतले. मंदिरात पूजा सामान नेण्यास बंदी असून, मूर्ती अथवा वस्तूंना हात लावण्यास मनाई असल्याने वेळेत ही बचत होत होती.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political interrupt after opening temple nashik marathi news