कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींचा हातभार; १३ दिवसांत २९ हजारांवर चाचण्या

political parties step up efforts to help fight corona virus marathi news
political parties step up efforts to help fight corona virus marathi news

नाशिक :  कोरोनाचे रुग्ण आढळत असताना मदतीचा हात म्हणून लोकप्रतिनिधींनी राबविलेल्या तपासणी मोहिमेत १३ दिवसांत २९ हजार १९५ रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यातून तीन हजार ३७९ पॉझिटिव्ह, तर २५ हजार ८१६ तपासण्या निगेटिव्ह आल्याने महापालिका प्रशासनाला कोरोनाशी दोन हात करताना मदत झाली आहे. महापालिकेकडे यंत्रणा असली तरी लोकप्रतिनिधींच्या शब्दाला मान देऊन नागरिकांनी स्वतःहून तपासण्या केल्याने कोरोनाबाधितांची साखळी खंडित करण्यास लोकप्रतिनिधींचा हातभार लागला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्रभागनिहाय घरे तपासण्याची मोहीम हाती घेतली. परंतु नागरिक स्वतःहून पुढे येत नव्हते. 
त्यामुळे कोरोना काळात लोकप्रतिनिधींच्या मदतीची गरज होती. नगरसेवक मैदानात उतरल्यास कोरोनाची साखळी खंडित होण्यास मदत होईल, असे मत तज्ज्ञांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर मांडले होते. त्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांनी शहरभर जोरदार तपासणी मोहीम राबविली. भाजपसह शिवसेना व अन्य पक्षही तपासणी मोहिमेत उतरले. 

मोहिमेला चांगला प्रतिसाद

या मोहिमेचे यश म्हणजे तपासण्यांमधून तब्बल तीन हजार ३७९ कोरोनाबाधित नागरिक समोर आले. शहराच्या विविध भागांत दररोज एक हजार २०० ते एक हजार ५०० तपासण्या झाल्या. आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या अर्सेनिक अल्बमच्या अडीच लाख गोळ्यांचे अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशासेविका, स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरोघरी वाटप करण्यात आले.शिक्षकांद्वारे सुरू असलेल्या सर्वेक्षणात शरीराचे तापमान मोजणे, ऑक्सिजन व पल्स रेट मोजणे, खोकला, दमा, रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, क्षयरोग, किडनी आजार, तसेच अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांबाबत तसेच गरोदर माता, इतर आजार व हृदयरोग आदी आजारांसंबधी माहिती विचारून संकेतस्थळावर नोंद केली जात असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

उपाययोजना दृष्टिपथात 
- जनजागृतीचा भाग म्हणून माहितीपत्रकांचे वाटप 
- अडीच लाख अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप 
- २५ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे तपासणी 
- महापालिका शिक्षकांच्या मदतीने सर्वेक्षण 
- तीस शहरी आरोग्य केंद्रांवर पथके 
- विभागनिहाय पथकांची निर्मिती 
- ६०० शिक्षकांकडून कोमॉर्बिड रुग्ण शोधण्याची मोहीम 


कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय पथकासह लोकप्रतिनिधींकडून तपासणी मोहीम राबविली जात असल्याने त्यातून कोरोनाची साखळी खंडित करण्यास मदत होत आहे. 
- सतीश कुलकर्णी, महापौर 


रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com