''सूक्ष्म नियोजनातून कोरोना संसर्गाला अटकाव करा'' - जिल्हाधिकारी

अरुण मलाणी
Wednesday, 14 October 2020

शासकीय जमिनींबाबत विषय असल्यास तातडीने प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवावे, तसेच ज्या विकासकामांना मंजुरी दिलेली आहे, त्यांचे लेखापरीक्षण वेळोवेळी करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिले. 

नाशिक : कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी बाधित रुग्ण शोधून त्यावर वेळेत उपचार होणे अत्यावश्यक आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. या मोहिमेद्वारे सूक्ष्म नियोजन करून कोरोनाच्या आपत्तीला अटकाव आणणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. या मोहिमेबाबत जनतेला आवाहन करा, हेल्पलाइन तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांना मंगळवारी (ता.१३) दिल्या. 

लेखापरीक्षण वेळोवेळी करण्याबाबत निर्देश

जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार राजेंद्र नजन आणि जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या माझी वसुंधरा योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती गठीत करणे आवश्यक आहे. पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नी या पंचतत्वांच्या संरक्षणासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करावयाचे आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रभावीपणे नियोजन करण्यात यावे. शासकीय जमिनींबाबत विषय असल्यास तातडीने प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवावे, तसेच ज्या विकासकामांना मंजुरी दिलेली आहे, त्यांचे लेखापरीक्षण वेळोवेळी करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिले. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी संधी

घनकचरा व्यवस्थापनातून स्रोत पुनरप्राप्ती केंद्र (resource recovery centre) उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात यावा. या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी संधी मिळणार आहे; त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी उपस्थित मुख्याधिकाऱ्यांना दिले. 

हेही वाचा >  धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prevent corona infection through micro-planning nashik marathi news