सिन्नरला लाभार्थ्यांना सन्मान निधी परत करण्याचे आदेश; २ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना नोटीस

अजित देसाई 
Thursday, 29 October 2020

सिन्नर तालुक्यात पीएम किसान योजनेचे ५४ हजार ३७ शेतकरी लाभार्थी असून, त्यांपैकी प्राप्तिकर भरणाऱ्या दोन हजार २१५ शेतकरी खातेदारांना ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून नोटीस बजावण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आले.

नाशिक/सिन्नर : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत चुकीच्या खात्यात तसेच अपात्र व्यक्तींच्या नावे जमा करण्यात आलेला निधी शासनाने परत मागविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या निर्णयानुसार सिन्नर तालुक्यातील दोन हजार २१५ लाभार्थ्यांना सन्मान निधी परत करण्याचे आदेश आले आहेत. 

चार दिवसांत रक्कम भरावी लागणार

पीएम किसान पोर्टलवर संकलित माहितीच्या आधारे पहिल्या टप्प्यात प्राप्तिकरदात्या शेतकऱ्यांना तहसीलदारांमार्फत नोटीस बजावण्यात येत असून, घेतलेल्या लाभाची रक्कम परत न केल्यास जमिनीच्या सातबारावर सरकारी बोजा टाकण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांत रोख स्वरूपात ही रक्कम भरावी लागणार असल्याने तहसील कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. 

शेतकऱ्यांची यादी राज्यांना पाठवली

सिन्नर तालुक्यात पीएम किसान योजनेचे ५४ हजार ३७ शेतकरी लाभार्थी असून, त्यांपैकी प्राप्तिकर भरणाऱ्या दोन हजार २१५ शेतकरी खातेदारांना ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून नोटीस बजावण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आले. या खातेदारांकडून दोन कोटी पाच लाख रुपये इतक्या रकमेचा भरणा करून घेतला जाणार असून, त्यांना योजनेच्या लाभासाठी अपात्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. एनआयसीने विकसित केलेल्या पोर्टलवरून शेतकऱ्यांची यादी राज्यांना पाठविण्यात आली आहे. पीएम किसान योजनेत वार्षिक सहा हजार रुपयांचे अनुदान तीन समान हप्त्यात शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात वितरित करण्यात येते. हा लाभ मिळविणारे अनेक शेतकरी प्राप्तिकर दात्यांच्या यादीत असल्याने अपात्र जाहीर करून त्यांना वितरित अनुदान शासनाकडे परत करण्यास सांगितले आहे. 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

स्वतंत्र कक्ष 

सिन्नर तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेली नोटीस दाखवून निर्दिष्ट रकमेचा रोख स्वरूपात तत्काळ भरणा करून शासकीय भरण्याची पावती प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार राहुल कोताडे यांनी केले आहे. गेल्या आठवड्यात या कक्षात १४ लाख रुपयांचा भरणा शेतकऱ्यांनी केला आहे. 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत
पुढच्या टप्प्यातील लक्ष्य 

शासनाने अपात्र लाभार्थ्यांना दिलेला योजनेचा लाभ परत करण्यास सांगितले असून, प्राप्तिकरदात्या शेतकऱ्यांपाठोपाठ मृत, दुबार लाभ मिळालेले शेतकरी, भूमिहीन व स्थलांतरित असलेल्या व्यक्तींकडून दुसऱ्या टप्प्यात अनुदान परत घेतले जाणार आहे. योजना सुरू झाल्यापासूम अनेक शेतकऱ्यांना दुबार अनुदान प्राप्त झाल्याचे प्रकार समोर आले होते. शिवाय प्रत्यक्ष शेती न कसणारे व नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी वास्तव्य करणारे कागदोपत्री शेतकरीदेखील आधार तपशिलामुळे सरकारच्या रडारवर येणार आहेत. 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prime minister kisan sanman yojana Order to return funds nashik marathi news