साडेसातशे कोटींच्या प्रकल्पांना घरघर; कोरोनामुळे डझनभर प्रकल्प अडचणीत

विक्रांत मते
Monday, 5 October 2020

कोरोनापूर्वी महापालिकेने अंदाजपत्रकात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करून निधीची तरतूद केली; पण कोरोनानंतर निर्माण झालेल्या आर्थिक पेचामुळे प्रशासनाच्या प्रकल्पांना घरघर लागणार असल्याची चिन्हे आहेत.

नाशिक : कोरोनापूर्वी महापालिकेने अंदाजपत्रकात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करून निधीची तरतूद केली; पण कोरोनानंतर निर्माण झालेल्या आर्थिक पेचामुळे प्रशासनाच्या प्रकल्पांना घरघर लागणार असल्याची चिन्हे आहेत.

साडेसातशे कोटींच्या प्रकल्पांना घरघर 

कोरोनामुळे सहा महिन्यांत महापालिकेचा बहुतांश निधी कोविड रुग्णांवर उपचारासह नगरसेवक निधी, पालिका कर्मचाऱ्याचे वेतन, पाणीपुरवठा, आरोग्य, वैद्यकीय या सुविधांवरच खर्ची पडणार आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी दोन हजार १६० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्यात नगरसेवकांना एकूण १२ कोटींच्या स्वेच्छा निधीसह प्रभाग विकासासाठी प्रत्येकी ३० लाखांची तरतूद करून खूश केले होते. शहरातील २३ खेड्यांच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद केली होती. अंदाजपत्रकात जमेच्या बाजूत जीएसटी अनुदानातून वार्षिक १०८१.८१ कोटी रुपये, मालमत्ता करातून १७० कोटी रुपये, नगररचना शुल्कातून ३५० कोटी, पाणीपट्टीतून ६५ कोटी, तर जाहिरात परवान्यांमधून १२ कोटी रुपये महसूल महापालिकेला मिळेल, असा अंदाज धरण्यात आला होता. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

कोरोनानंतर आर्थिक अडचणीमुळे डझनभर प्रकल्प अडचणीत 
खर्चाच्या बाजूने खेडे, नवनगरांसह मुख्य रस्त्यांसाठी १६६ कोटी रुपये पूल व सांडवेनिर्मितीसाठी अठरा कोटी रुपये, अडथळामुक्त शहर व चार सायकल ट्रॅक, पार्किंगसाठी १.२० कोटी रुपये, नाट्यगृह बांधणीसाठी पंधरा कोटी, मार्केट व तरण तलाव बांधण्यासाठी दोन कोटी, क्रीडांगणे विकासासाठी २८.२० कोटी रुपये, स्मशानभूमी सुधारणेसाठी आठ, शहर बस डेपो- ४० कोटी, पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी १२०.४६ कोटी रुपये, मलनिस्सारण व्यवस्थेसाठी १३५.३३ कोटी, वीज व्यवस्थेसाठी २७.४३ कोटी, तर भूसंपादनासाठी १४० कोटी रुपये शिक्षण विभागासाठी ९७.३७ कोटी रुपये, घनकचरा व्यवस्थापन ९७.१७ कोटी, वैद्यकीय विभागासाठी ५१.८७ कोटी, उद्यान विकासासाठी २४.२३ कोटी, पशुवैद्यकीय सेवेसाठी ६.४० कोटी, तर परिवहन सेवेसाठी ७० कोटींची तरतूद होती. मात्र परिवहन, विद्युत, वैद्यकीय, आरोग्य, पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्था वगळता अन्य प्रकल्प गुंडाळले जाणार आहेत. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल
कुठल्या प्रकल्पांना घरघर 
-रामायण बंगल्याजवळ १२ मजली नवीन इमारत. 
-नाशिक रोड, पाथर्डी येथे प्रस्तावित कत्तलखाने 
-बारा मजली इमारतीत पहिले दोन मजले पार्किंग 
-नगरपरियोजनेच्या पायाभूत सुविधांची तरतूद 
-शहरातील २३ खेड्यांत पायाभूत सुविधा 
-कच्च्या रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण 
-जोडरस्त्यांचा विकास (मिस लिंक). 
-पंचवटीत महिलांसाठी नवीन तरण तलाव 
-गंगापूर रोड, आडगावला नवीन व्यावसायिक संकुल 
-चौकांचे ट्रॅफिक ऑडिट  

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: project is in financial trouble due to Corona nashik marathi news