आदिवासी भागाला वळणबंधारे वरदान! इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये सिंचनासाठी प्रस्ताव

गोपाळ शिंदे
Saturday, 24 October 2020

इगतपुरी तालुक्यात पावसाळ्यात धो-धो पडणाऱ्या पावसाचे पाणी योग्यरीत्या अडविले जात नसल्याने घनदाट जंगल व डोंगरमाथ्यावरून ते पश्चिमेकडे वाहून जाते. यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण होते.

घोटी (जि.नाशिक) : इगतपुरी तालुक्यात पावसाळ्यात धो-धो पडणाऱ्या पावसाचे पाणी योग्यरीत्या अडविले जात नसल्याने घनदाट जंगल व डोंगरमाथ्यावरून ते पश्चिमेकडे वाहून जाते. यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेस वळवून वळणबंधाऱ्याद्वारे अडविल्यास इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमधील आदिवासी बांधवांची पीकपद्धती बदलून उत्पादनाची साधने व रोजगाराच्या संधी निर्माण निर्माण होतील. याकरिता दोन्ही तालुक्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून मंत्रालयस्तरावर आमदार हिरामण खोसकर यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. 

आदिवासी भागाला वळणबंधारे वरदान 
येवला-चांदवड, मांजरपाडा वळण बंधारा, नार-पार-भेगू या पश्चिम वाहिन्या नद्यांना वळण देऊन, पूर्ववाहिन्यांचा पॅटर्न प्रभावीपणे राबविल्यास येथील आदिवासींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करेल. वळणबंधारे क्षेत्रातील दोन्ही तालुक्यांतील बरेच क्षेत्र वन विभागाच्या अधीन आहे. इगतपुरी तालुक्यातील आवळखेड-कासवाडी-चिंचलेखैरे व त्र्यंबकेश्वरमधील दुगारवाडी-आंबोली घाट, वाघेरे-सोमनाथनगर, चंद्राची मेट-हुम्याची मेट या दुर्गम परिसरात पाच टीएमसी पाणी अडवून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये इगतपुरीत वन विभागाचे १०० हेक्टरच्या जवळपास व त्र्यंबकेश्वर वळणबंधारा बांधकामासाठी दोनशेहून अधिक हेक्टर जागेची मागणी प्रकल्प प्रस्तावाद्वारे जलसंधारणमंत्री व वनसंवर्धनमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! उपजिल्हाधिकारी दालनात युवकाने अंगावर पेट्रोल ओतले; जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ

पंचवीस हजार हेक्टरवर सिंचन 
मंजुरी व निधी तातडीने मिळाल्यास हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागेल. इगतपुरी तालुक्यात दहा हजार हेक्टर व त्र्यंबकेश्वरमध्ये १५ हजार हेक्टर असे एकूण २५ हजार हेक्टरवर सिंचनाच्या सुविधेतून शेकडो गावांतील पाणीटंचाई व शेती हिरवीगार होणार आहे. पुढे जाऊन जंगल परिसरात वाढ होण्यास मदत होणार आहे. सर्व छोटे-मोठे वळणबंधारे व कालव्यांसाठी सहाशे कोटी रुपये खर्च निश्चित आहे. माजी आमदार पुंजाबाबा गोवर्धने यांनी वळणबंधारे बांधण्याचे ठरविले होते. मात्र शासकीय उदासीनता व पाठपुराव्यासाठी आधारभूत सुविधांची वानवा असल्याने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकले नाही. 

हेही वाचा >क्षणार्धात संसाराची राखरांगोळी! चव्हाण कुटुंबियांचे ५० हजारांचे नुकसान 

पाठपुरावा सुरू

आदिवासी बांधव शेती व मजुरीवर अवलंबून असल्याने निसर्गाच्या प्रकोपापुढे निश्चित उत्पादन मिळत नाही. दोन्ही तालुक्यांतील पश्चिमेस वाया जाणारे पाणी अडवून सिंचन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी प्रस्ताव तयार करून पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. -हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for tribal areas Irrigation Igatpuri Trimbakeshwar nashik marathi news