नाशिककरांसाठी ॲन्टिजेन टेस्ट किट, रेमडेसिव्हिर इंजेक्शनची खरेदी; १ कोटींपैकी ४४ लाखांच्या पुरवठ्याचे आदेश 

महेंद्र महाजन
Sunday, 4 October 2020

फिजिशिअन आणि भूलतज्ज्ञ असे मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या ठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामध्ये सिन्नर, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, चांदवडचा समावेश असेल.

नाशिक : ग्रामीण-आदिवासी भागातील कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव वेळीच शोधून काढत उपचारासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. एक कोटीच्या निधीपैकी ४४ लाखांच्या दहा हजार ॲन्टिजेन टेस्ट किट आणि रेमडेसिव्हिरचे १२० इंजेक्शन पुरवठ्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ॲन्टिजेन टेस्ट किटची किंमत दिवसेंदिवस कमी होत असल्याने एकदम खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. 

फिजिशिअन आणि भूलतज्ज्ञ असे मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या ठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामध्ये सिन्नर, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, चांदवडचा समावेश असेल. याठिकाणच्या इंजेक्शनमुळे होणाऱ्या चांगल्या परिणामांचा अभ्यास करून उर्वरित भागात हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाईल, असे सांगून श्रीमती बनसोड म्हणाल्या, की सिन्नर, निफाड, नाशिक, नांदगाव, इगतपुरी, मालेगाव या तालुक्यांत वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या अनुषंगाने ॲन्टिजेन टेस्ट किटच्या वापरावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. जिल्ह्याच्या इतर भागामध्ये सुद्धा टेस्ट किटचा वापर करण्यात येणार आहे. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

४९२ चे कीकिट ४१० रुपयांना 

ॲन्टिजेन टेस्ट किटची किंमत ४९२ रुपये होती. जिल्हा परिषदेने हे किट खरेदीचा निर्णय घेतल्यावर त्याची किंमत ४५६ रुपये अशी झाली. प्रत्यक्षात हे किट आताच्या ४१० रुपये या दराने खरेदी करण्यात आले आहे. किटच्या कमी होत चाललेल्या किमतीच्या अनुषंगाने येत्या आठवडाभराने त्यावेळची किंमत पाहून खरेदीचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्रशासनातर्फे दिले जाणार आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या साडेचार ते पाच हजारांच्या आसपास स्थिरावल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. तरीही जिल्हा परिषदेतर्फे कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठीची तयारी पुढे सुरू ठेवण्यात आली आहे. 

 
आरोग्य केंद्रात उपचाराची व्यवस्था 

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारण्याची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन पुरवठा व्यवस्था झाली आहे. ताहाराबाद आणि बाऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातही हे सेंटर सुरू केले जाणार आहेत. भारमला २०, ताहाराबादला २०, तर बाऱ्हेमध्ये ३० खाटांची व्यवस्था असेल. इगतपुरीमधील ट्रॉमाकेअर सेंटरमध्ये ३० खाटा होत्या. आता शेजारील ग्रामीण रुग्णालयात आणखी ३० खाटा वाढविण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

मनमाडमध्ये नवीन ३० खाटांचे रुग्णालय सुरू केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वेचा हॉल पाहण्यात आला आहे. याशिवाय रुग्णालयाची पाहणी आरोग्य यंत्रणेकडून केली जात आहे. येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर आणखी ४० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. सद्यःस्थितीत कोविड केअर सेंटरमध्ये अठराशे खाटा असून, भविष्यात आणखी सतराशे खाटा वाढवून साडेतीन हजार खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तयारी केली आहे. 
-डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purchase of antigen test kit, remdesivir injection in Nashik news