वाद्यांचा आवाज दबला!  बागलाण तालुक्यात दोनशे ते अडीचशे कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न

mandap 12.jpg
mandap 12.jpg

सटाणा ( जि.नाशिक)  : नवरात्र, गणेशोत्सव, शिवजयंती, फिरत्या नारळाचा कार्यक्रम, हरिनाम सप्ताह, गावची जत्रा-यात्रा याशिवाय शोभत नाही. साखरपुडा, बर्थडे, सेलिब्रेशन, नामकरण विधी यांसारख्या कार्यक्रमांना दारात मंडपाची झालंर लावल्याशिवाय इव्हेंट वाटतच नाही. अशा या कार्यक्रमांची शोभा वाढविणारे मंडप, स्पीकर, डेकोरेटर्सचा व्यवसाय मात्र कोरोनामुळे चितपट होऊन या व्यवसायावर आधारित बागलाण तालुक्यातील तब्बल दोनशे ते अडीचशे कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

बरेचसे व्यावसायिक देशोधडीला; कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न 

कार्यक्रम मग तो कोणताही, कुणाचाही, कोठेही असो घरचाच कार्यक्रम समजून मंडप डेकोरेटर्सवाले जबाबदारी पार पाडतात. कोरोनापूर्वी हा व्यवसाय म्हणजे कमाई होती. सर्वांनाच ‘अच्छे दिन’ होते. मात्र कोरोनाचे सावट आले आणि या व्यावसायिकांचे होत्याचे नव्हते झाले. या धंद्यात गुंतवणूक केलेले पैसे अडकून पडलेत. व्यवसायातील चढाओढ पाहून सिनेमासृष्टीलाही लाजवेल अशा झगमगाटासाठी राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, पतसंस्था, खादी ग्रामोद्योग किंवा इतर संस्थांकडून घेतलेले कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यांचे व्याज वाढत आहे. घरात अगोदर शिल्लक म्हणून असलेले पैसे काम नसतानाही बसून कामगारांना पगार द्यायची वेळ आल्याने या व्यावसायिकांच्या कर्जबाजारीपणात वाढ होत असल्याने बरेचसे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. 

व्यावसायिकांवर मात्र कोरोनाने रडण्याची वेळ
जोखीम असताना कधी स्मशानभूमीत, गावकुसाबाहेर, शेतशिवार, वाडी-वस्ती, झाडाझुडपांत, तर कधी जंगलातही मंडप, स्पीकर, डेकोरेशन लावून सुशोभित करणे, विद्युत रोषणाई लावून रस्त्याच्या दुतर्फा खांबावरून विद्युत माळा बांधणे, झालर लावणे हे करताना तेथील घाण-कचरा, त्या जागेवर यापूर्वी काही घडले आहे किंवा काय याचा विचार न करता हे शेकडो हात राबराब राबत असतात. वर्षभर दहा ते पंधरा मजुरांना पगार देऊन कायम कामावर ठेवले तरच सिझनभर मजूर मिळतात. सरासरी चारशे रुपये रोज मजुरी ठरलेली असते. कष्टाने काम मिळाले; मात्र कोरोनाने सर्वकाही हिरावून नेले आहे. अनेकांच्या सुखात हसणारे, दुःखात रडणाऱ्या व्यावसायिकांवर मात्र कोरोनाने रडण्याची वेळ आणली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

व्यवसायाची स्थिती 
सटाणा शहरात ४७ व्यावसायिक * तालुक्यात लहान मोठे १५६ व्यावसायिक * बिदागी कमीत कमी दहा हजार जास्तीत जास्त एक लाख * सरासरी तीन लाख ते तीस लाख * दहा ते बारा कोटींपेक्षा अधिक उलाढाल ठप्प * कामगारांना दिलेला ॲडव्हान्स बुडाला * नवीन साधनसामग्रीवर गुंतवणूक केलेले पैसे अडकले * कर्जावरचे व्याज वाढले * हप्ते न भरल्याने थकबाकी रकमेत वाढ * उत्पन्नाचा मार्ग बंद * पर्यायी व्यवसायाचा शोध. 

या व्यवसायात दर वर्षी नवनवीन डिझाइन व आत्याधुनिक सिस्टीमसाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. त्यावर १४ टक्के वाढीव जी.एस.टी. भरल्याशिवाय कापडी साहित्य मिळत नाही. गुढीपाडव्यापर्यंत भांडवल, मजुरी, वाहतूक यावर मोठा खर्च होतो. त्यानंतर झालेल्या व्यवसायावर नफा मिळतो. कोरोनाने सर्व व्यावसायिकांना तोट्यात लोटले. आमच्या व्यवसायाला शासनाने उद्योगाचा दर्जा द्यावा. - मंगेश भावसार, उपाध्यक्ष- बागलाण तालुका मंडप डेकोरेटर्स असोसिएशन 

लॉकडाउनमुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनंतर व्यवसाय ठप्प झाला आहेत. मोठ्या लग्नसोहळ्यांसाठी हायहोलटेज जनरेटर व्हॅन, लायटिंगसाठी दिलेला ॲडव्हान्स परत मिळाला नाही. आम्हाला मात्र लोकांकडून घेतलेला लग्नतारखांचा ॲडव्हान्स परत द्यावा लागला. इव्हेंट रद्द होऊन आमचा व्यवसाय पूर्ण तोट्यात गेल्याने आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. -आश्पाक फारूक तांबोळी, नवोदित व्यावसायिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com