''देवेंद्रजी.. सव्वा वर्षात बाळासाहेब सानप पवित्र कसे?'' फडणवीसांच्या 'त्या' क्लिपद्वारे भाजपला शिवसेना, राष्ट्रवादीकडून सवाल

Balasaheb-Sanap-Devendra-Fadnavis.jpg
Balasaheb-Sanap-Devendra-Fadnavis.jpg

सव्वा वर्षात बाळासाहेब सानप पवित्र कसे? 

शिवसेना, राष्ट्रवादीकडून सवाल; क्लिपद्वारे भाजपच्या कोंडीचे प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा 
 

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत व आता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तिकीट कापले होते. सव्वा वर्षानंतर सानप यांना पुन्हा भाजपमध्ये घेताना ते भ्रष्टाचारमुक्त झाले का, असा सवाल शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान फडणवीस यांच्या भाषणाची ती व्हिडिओ क्लिप शहरभर लावण्याचे नियोजन करून भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. 

सव्वा वर्षात बाळासाहेब सानप पवित्र कसे? 
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये नाराजीचा खेळ रंगला होता. माजी आमदार बाळासाहेब सानप यांना साइड ट्रॅक करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्यानंतर पक्षांतर्गत वातावरण तापले होते. विधानसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली त्या वेळी सानप यांचे नाव वगळल्याने पक्षाकडून पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी वेगळा विचार सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी ॲड. राहुल ढिकले यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. व्यथित झालेल्या सानप यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. ॲड. ढिकले यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गंगाघाटावर जाहीर सभा घेतली. त्या वेळी सानप वीस वर्षांपासून पक्षात होते. त्यांनी अपारदर्शक कारभार केला. भ्रष्टाचार केल्याने त्यांचे तिकीट कापण्याचा कडक निर्णय घ्यावा लागल्याचे फडणवीस यांनी जाहीर सभेत भाषण केले होते.

शिवसेना, राष्ट्रवादीकडून सवाल; क्लिपद्वारे भाजपच्या कोंडीचे प्रयत्न 

सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता विरोधकांकडून फडणवीस यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावरून फिरविली जात असून, त्यात स्पष्टपणे सानप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. हीच क्लिप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससाठी भांडवल ठरत आहे. 

भाजपकडूनच खतपाणी? 
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतून आता सानप पुन्हा भाजपमध्ये आल्याने त्यांना स्थिरस्थावर होऊ देणे भाजपच्या आमदारांसह मातब्बर नगरसेवकांना परवडणारे नाही. त्यामुळे सानप यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोट बांधल्याचे वृत्त आहे. फडणवीस यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होणे हा पक्षांतर्गत चढाओढीचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. 

भाजपने सानप यांचा केसाने गळा कापला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत उत्तर द्यावे लागणार आहे. -सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना 

भाजपवालेच ठरवतात कोणाला कधी पावन करायचे व भ्रष्टाचारी ठरवायचे. ही त्यांची जुनी नीती आहे. फडणवीस यांचा गैरसमज दूर करणारी कोणती यंत्रणा आहे, हे त्यांनी नाशिककरांना सांगावे. -रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com